![]()
करमाळा तालुक्यातील भोंदू मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले हा विविध गुन्ह्यांमध्ये अटकेत असून सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र त्याच्यावर यापूर्वी दाखल झालेल्या एका फसवणूक प्रकरणात अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा पोलीस ठाण्यात दि. ६ मे २०२६ रोजी मनोहर भोसले व विशाल उर्फ नाथा वाघमारे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो करमाळा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार त्यांची सन २०२१ पासून मनोहर भोसलेनी तब्बल १ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. यानंतर दि. ११ मे रोजी दाखल झालेल्या दुसऱ्या गुन्ह्यात करमाळा पोलिसांनी मनोहर भोसले याला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवार दि. १५ मे रोजी झालेल्या सुनावणीत करमाळा न्यायालयाने पुढील पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र दि. ६ मे रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याला आता १२ दिवस उलटून गेले तरी त्या प्रकरणात अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक होते, पण आधीच्या गुन्ह्यात कारवाई का नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी या विषयावर चर्चा रंगताना दिसत आहे. फिर्यादीनेही करमाळा पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर आरोप करीत आरोपीने माझ्या तक्रारी विरोधात उच्च न्यायालयात अपील केले असल्यामुळे पोलिसांकडून जाणीवपूर्वक वेळ दिला जात असल्याची शंका व्यक्त केली आहे. ^फिर्यादी म्हेत्रे यांच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात अद्याप मनोहर भोसले याला अटक करण्यात आलेली नाही. मात्र या गुन्ह्यातही त्याला लवकरच अटक करण्यात येणार आहे. पोपट टिळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे
Source link
करमाळा पोलिसांच्या भूमिकेवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह:12 दिवस उलटले तरी भोंदू मनोहर मामाला दुसऱ्या गुन्ह्यात अटक नाही