.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात कमळ पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिजंट-टेल जाकाना या पक्ष्याच्या प्रजनन वर्तनामध्ये संभाव्य बदलाची नोंद पक्षी अभ्यासक प्रा. आनंद बोरा यांनी केली आहे.
सामान्यतः फिजंट-टेल जाकाना हा पक्षी पाण्यावर तरंगणाऱ्या कमळाच्या पानांमध्ये किंवा जलवनस्पतींच्या सुरक्षित भागात घरटी बांधतो. त्याच्या लांब व बारीक बोटांमुळे तो पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतींवर सहज हालचाल करू शकतो. त्यामुळे कमळाची पाने हा त्याचा पारंपरिक अधिवास मानला जातो. मात्र, निरीक्षणादरम्यान कमळाच्या पानांमध्ये घरटे करण्याऐवजी या पक्ष्याने जलपर्णीमध्ये प्रजननासाठी जागा निवडल्याचे आढळले. पक्षी पर्यावरणातील परिस्थितीनुसार स्वतःच्या वर्तनात बदल करत असल्याचे समोर आले आहे. अशा बदलांचे निरीक्षण, दस्तऐवजीकरण अत्यंत महत्त्वाचे असते.
पक्षीशास्त्रीय माहितीनुसार भारतात फिजंट-टेल जाकानाचा प्रजनन कालावधी जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगामात मानला जातो. पावसाळ्यात जलवनस्पतींची वाढ, अन्नाची उपलब्धता, पाण्याची पातळी आणि सुरक्षित अधिवास या कारणांमुळे हा कालावधी प्रजननासाठी अनुकूल ठरतो.
नांदूरमध्यमेश्वरमध्ये मे महिन्यातच या पक्ष्याची पिले दिसून आल्याने एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणथळ क्षेत्रातील वनस्पतींची रचना, पाण्याची पातळी, सूक्ष्म हवामान आणि अन्नसाखळी यामध्ये होत असलेल्या बदलांचा परिणाम अशा स्वरूपात दिसून येण्याची शक्यता असते. कमळ पक्ष्याचे हे निरीक्षण अशाच एका संभाव्य बदलाची नोंद म्हणून महत्त्वाचे ठरू शकते.
नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात कमळ पक्ष्याच्या घरटे निवडीत आणि प्रजनन कालावधीत दिसून आलेले हे निरीक्षण प्राथमिक स्वरूपाचे असले तरी ते अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा निरीक्षणांचे दीर्घकालीन दस्तऐवजीकरण झाल्यास भविष्यातील संशोधनासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. पर्यावरणीय बदलांचा पक्ष्यांच्या जीवनशैलीवर नेमका कसा परिणाम होतो, यासाठी अधिक सखोल अभ्यासाची आवश्यकता आहे. – प्रा. आनंद बोरा , पक्षी अभ्यासक