![]()
ज्येष्ठ सर्वोदयी रामकृष्ण आढे यांनी महात्मा गांधी, विनोबाजी, जयप्रकाश नारायण यांच्या सहवासात राहून भूदान, ग्रामदान, सर्वोदय चळवळीला सर्वस्व समर्पित केले. मोहमायातून मुक्ती घेऊन त्यांनी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष रमेश दाणे यांनी केले. मारूती संस्थान केळीवेळी येथे “स्व.रामकृष्ण आढे स्मृती विदर्भभूषण पुरस्कार’ मनजितसिंह शीख यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी बोलत होते. ज्येष्ठ गांधीवादी महेंद्रबाबू गोयनका कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे महासचिव बजरंग सोनवणे, भूदान मंडळाचे सचिव एकनाथ डगवार, ग्राममंडळ केळीवेळीचे अध्यक्ष किशोर बुले, सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांची विचारपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम स्व. रामकृष्ण आढे यांच्या फोटोचे पूजन व हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रास्ताविक डॉ. राजकुमार बुले यांनी केले. अतिथी व पुरस्कारार्थींचा परिचय डॉ. शिवचरणसिंह ठाकूर यांनी करून दिला. सन्मानपत्राचे वाचन डॉ. महेंदसिंग ठाकुर यांनी केले. गोरक्षा, भूदान, ग्रामदान, महिला सक्षमीकरण व आदिवासी हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला स्व. रामकृष्ण आढे यांचे स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भभूषण पुरस्कार दिला जातो. २०२६ चा पुरस्कार सातपुडा पर्वत रांगेतील सालईबन ता. जळगाव जामोद येथील सर्वोदयी कार्यकर्ते मनजितसिंह शीख यांना मानपत्र, शाल श्रीफळ देऊन प्रदान करण्यात आला. सलाईबन सारख्या आदिवासी दुर्गम भागात मंजितसिंह शीख या ध्येयवेड्या तरुणाने स्वतःला खपवून घेतले. त्यामुळे आज तो परिसर हिरवागार झाला आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने अशा कार्यकर्त्यांची आज देशाला गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे महासचिव बजरंग सोनवणे यांनी केले. स्व. रामकृष्ण आढे यांनी आपली १८ एकर जमीन भूदानात समर्पित केली. स्वतः भूमिहार होऊन केळीवेळी सारख्या गावाला पहिले ग्रामदान गाव केले. त्यांचे भूदानाचे कार्य अफाट व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन भूदान मंडळाचे सचिव एकनाथ डगवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सुनील अवचार यांनी केले. आभार प्रदर्शन महेश वसंतराव आढे यांनी केले. कार्यक्रमास नितीन भरणे, दिलीप आढे, रविकांत आढाव, माया धांडे, सुभाष ठाकरे, रमेश घुले, अनिल श्रीकृष्ण वाघमारे, अमोल गजानन चीलात्रे, तुषार हिवरे, अमोल नळे, नजीर शाह आमद शाह आदींसह सर्वोदयी कार्यकर्ते उपस्थित होते. विदर्भभूषण पुरस्कार जीवन समृद्ध करणारा सत्काराला उत्तर देताना मंजीतसिंह शीख यांनी स्व. रामकृष्ण आढे यांच्या कार्याला अभिवादन करत बाबा आमटे, जयवंत मठकर आदींच्या प्रेरणेने आपण आदिवासी भागात सर्वोदय विचाराने प्रेरित होऊन पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन, निसर्ग रक्षणाचे काम सुरू केले. त्यामागे आढेजींची प्रेरणा होती. त्यांच्या नावाने मिळालेला विदर्भभूषण पुरस्कार हा माझे जीवन समृद्ध करणारा आहे. “हाथ लगे निर्माण में नहीं माँगने, नहीं मारने” या उक्तीतून नवतरुणांना सोबत घेऊन मी गांधी विचार आदिवासी पाड्यात रुजवण्याचा व निसर्ग रक्षण करत असल्याचे प्रतिपादन केले.
Source link
रामकृष्ण आढेंनी सर्वोदय चळवळीला आपले सर्वस्व समर्पित केले- दाणे:मंजीतसिंह शीख यांना स्व. रामकृष्ण आढे स्मृती विदर्भभूषण पुरस्कार प्रदान