महापालिकेतील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सरकारी निधीची विल्हेवाट लावण्याचा एक मोठा प्रकार ‘डीबी स्टार’च्या पाहणीत उघड झाला आहे. पडेगाव सबस्टेशन ते सफारी पार्क या ३० मीटर रुंद डीपी रोडसाठी मंजूर झालेला ११ कोटी २५ लाख निधी अधिकारी आणि
.
मनपा कार्यकारी अभियंत्यांच्या स्वाक्षरीने कंत्राटदार पी. एस. बागडे यांना ११ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यादेश देण्यात आला होता. नियमानुसार, पडेगाव सबस्टेशन ते सफारी पार्क या मुख्य रस्त्याचे काम ९ महिन्यांत पूर्ण होणे बंधनकारक होते. मात्र, कार्यादेश मिळून सहा महिने उलटले तरी मुख्य रस्त्यावर कामाची एक वीटही रचली गेलेली नाही. उलट, कंत्राटदाराने अधिकाऱ्यांच्या संगनमताने नियमबाह्य पद्धतीने दुसऱ्याच भागात रस्ता बनवण्याचे काम केले आहे. हे काम सुरू असताना मनपा अधिकारी गप्प का आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पडेगाव, मिटमिटा परिसरातील नागरिकांना धूळ आणि खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत असताना, त्यांच्या हक्काचा पैसा वळवून अनधिकृत काम मार्गी लावले जात आहे. या प्रकारामुळे शहराच्या नियोजित विकास आराखड्याला हरताळ फासला जात असून, या अधिकारी-कंत्राटदार साखळीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
निधीचा असा झाला खेळपडेगाव सबस्टेशन ते सफारी पार्क या ३० मीटर रुंद डीपी रोडच्या कामाचे एकूण एस्टिमेट १४ कोटी १८ लाख ८० हजार इतके होते. स्पर्धात्मक निविदेनंतर हे काम ११ कोटी २५ लाख १५ हजार रुपयांना मंजूर करण्यात आले. कंत्राटदाराने या कामासाठी १ टक्का सुरक्षा ठेव (११.३० लाख रुपये) जमा केली असून, ११ नोव्हेंबर २०२५ रोजी या कामाची वर्क ऑर्डरही जारी झाली. मात्र, ११ कोटींचा हा निधी मूळ रस्ता सोडून आता नियमबाह्य मार्गावर खर्च होत आहे.
पडेगाव आणि मिटमिटा रस्त्यावर सध्या वाहनांची प्रचंड वर्दळ असते, ज्यामुळे नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. नव्या डीपी प्लॅननुसार पडेगाव सबस्टेशन ते सफारी पार्क हा ३० मीटर रुंद रस्ता तयार झाल्यास शहराला एक मोठा पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. यामुळे मुख्य रस्त्यावरील ताण कमी होऊन प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. मात्र, अधिकारी आणि कंत्राटदाराच्या मनमानीमुळे हा प्रकल्प रखडला आहे.

अधिकाऱ्यांनी मार्किंग करून दिली
मनपाच्या निविदेनुसार कायदेशीररीत्या टेंडर भरल्यानंतर त्याला मंजूरी मिळाली. संबंधित अधिकाऱ्यांनी मार्किंग करून दिली आणि त्यानुसारच कामाची जागा (साइट) दाखवण्यात आली. प्रशासनाने करून दिलेल्या त्याच मार्किंगनुसार सध्या काम सुरू आहे. याशिवाय मला पालिकेचे इतर कोणतेही टेंडर मिळालेले नाही. पी. एस. बागडे, कंत्राटदार
रस्त्याचा पैसा इतरत्र वळवला
सफारी पार्कचे काम अंतिम टप्यात आहे. वर्क आर्डर झालेला रस्ता अपेक्षित होता. या रस्त्यामुळे पर्यटकांसह शहराला पर्यायी मार्ग मिळाला असता.मात्र अधिकारी व कंत्राटदार सर्व नियम धाब्यावर बसवत दुसराच रस्ता बांधत आहेत. शहराचा विकास कागदावरच दिसत आहे. गणेश लोखंडे, नगरसेवक
अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच नियमांना हरताळ
स्थळ पाहणी करणे, मोजमाप पुस्तिका भरणे ही जबाबदारी असलेल्या मनपा इंजिनिअर्सनी या कामाकडे दुर्लक्ष केले. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या या साखळीने शहराच्या नियोजित विकास आराखड्याचीच वाट लावली असून सर्व नियमांना हरताळ फासला गेला.
- मनपाकडून कंत्राटदार बागडे यांना देण्यात आलेली वर्क ऑर्डर ‘डीबी स्टार’च्या हाती लागली आहे. यात सबस्टेशन ते सफारी पार्कचे काम करण्याचे आदेश दिले आहेत.
शहर विकासाच्या दृष्टीने रस्ता
पडेगाव सबस्टेशन ते सफारी पार्क रस्त्याची वर्क ऑर्डर आहे. मात्र, मिस्बाह कॉलनी ते गोल्फ मैदानाच्या पुढे सिमेंट रस्तादेखील मंजूर आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा रस्तादेखील महत्त्वाचा आहे. तसेच या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होण्याची दाट शक्यता असल्याने मंजूर असलेला रस्ता सुरुवातीला बांधला जात आहे. संजय कोंबडे, शहर अभियंता, मनपा
- वर्क ऑर्डर निघालेल्या रस्त्याचे काम सोडून कंत्राटदार मिस्बाह कॉलनीतील रस्त्याचे काम करत आहे. या कामासाठी कंत्राटदाराने रस्त्यावर मुरूम आणून टाकला आहे.
- सेक्टर १ चा मंजूर असलेला नवीन विकास आराखडा.
- नवीन विकास आराखड्यात पडेगाव सबस्टेशन ते सफारी पार्क हा ३० मीटर रुंद रस्ता मजूर असून याची वर्क आर्डर निघलेली आहे.