![]()
परिसरात खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतीच्या मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. परंतु, डिझेल दरवाढ, सुट्या भागांचे दर तसेच मजुरीतील वाढ यामुळे ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या तयारीचा खर्च ग्रामीण भागात प्रचंड वाढलेला दिसत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य शेतकरी नांगरणी, वखरणी, रोटाव्हेटर आणि इतर मशागत कामांसाठी ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत. मागील काही दिवसांमध्ये झालेल्या डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टर धारकांनी प्रतितास भाड्यात वाढ केली असून, काही ठिकाणी तर डिझेलसाठी भटकंती करावी लागत आहे. हा अतिरिक्त अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या तोंडाला फेस आणत आहे. ट्रॅक्टरचालकांची मागणी वाढल्याने भाडेदरही वाढले आहेत. नांगरणीसाठी प्रतितास ७०० ते ८०० रुपये, तर वखरणीसाठी ६०० ते ७०० रुपये आकारले जात असल्याचे स्थानिक शेतऱ्यांनी सांगितले. काही भागांत तर वेगळ्या पद्धतीने ८०० रुपयांपेक्षाही अधिक रक्कम आकारली जात असल्याची चर्चा आहे. ट्रॅक्टरचे सुटे भाग महाग झाले असून दुरुस्तीसाठी लागणारा खर्च वाढला आहे. तसेच डिझेल दरवाढीमुळे एकूणच खर्च वाढल्याने ट्रॅक्टर मालकही भाडे वाढविण्यास बाध्य झाले आहेत. दुसरीकडे मजुर सहज उपलब्ध होत नसून मजुरीच्या वाढलेल्या खर्चामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. ट्रॅक्टरचे भाडे तासाला २५ टक्क्याने महागले ^दरवर्षी खरीपपूर्व मशागत काही प्रमाणात परवडायची. पण, यंदा ट्रॅक्टरचे एका तासाचे भाडेच २० ते २५ टक्के वाढले आहे. डिझेल महाग, मजुरी महाग, बियाणे-खतेही महाग.शेतकऱ्यांसमोर खरोखरच मोठे संकट उभे राहिले आहे. – नामदेव पाटील, शेतकरी, अंजनगाव बारी इंधन दरवाढीसाठी सरकारवर ताशेरे सरकारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सर्वत्र निषेध केला जात असून, जनतेने सरकारवर तीव्र ताशेरे ओढले आहेत. सतत वाढणाऱ्या इंधन दरामुळे वाहतूक, शेती आणि घरगुती खर्चात मोठी भर पडली आहे. महागाईचे ओझे वाढत असताना सरकार दर कपात करण्याऐवजी जनतेच्या खिशावरच डल्ला मारत असल्याची टिका नागरिकांनी केली आहे. इंधन दर नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही करण्यात येत आहे. दरवाढ तातडीने मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिक आणि शेतकरीवर्गाकडून होत आहे.
Source link
ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या मशागत खर्चामध्ये मोठी वाढ; डिझेल दरवाढीचा फटका:नांगरणीसाठी 800 रु., वखरणीसाठी 700 रु. प्रतितास खर्च