![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत घडामोडी आणि नेत्यांच्या गाठीभेटींमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असतानाच, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर एक मोठी शैक्षणिक व सामाजिक जबाबदारी सोपवली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या आशियातील सर्वात मोठ्या ‘रयत शिक्षण संस्थे’च्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या ६ वर्षांपासून ते संस्थेवर सदस्य म्हणून कार्यरत होते. अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने रोहित पवार नाराज असल्याच्या आणि पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याच्या वावड्या उठल्या होत्या; मात्र थेट विभागीय अध्यक्षपद देऊन शरद पवारांनी रोहित पवारांवर असलेला आपला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. माझ्या कामाची ही पोचपावती- रोहित पवार या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल आनंद व्यक्त करत आमदार रोहित पवारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. बहुजन समाजाच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्थापन झालेल्या ‘रयत’च्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आदरणीय पवार साहेब आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार! गेली सहा वर्षे सदस्य म्हणून सर्वांना सोबत घेऊन केलेल्या कामाची ही पोचपावतीच आहे. भविष्यातही कर्मवीर अण्णांच्या विचारांवर चालताना आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील, असे रोहित पवारांनी म्हटले आहे. ‘रयत’ ग्लोबल होणार! दुसरीकडे, सन 2026 ते 2029 या पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ‘रयत शिक्षण संस्थे’च्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली. या पदासाठी केवळ त्यांचाच एकमेव अर्ज आल्याने ही निवड निश्चित झाली. काही दिवसांपूर्वीच अध्यक्षपदाची धुरा पुन्हा हाती घेताच शरद पवारांनी संस्थेचा चेहरामोहरा बदलणारे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देणारे अनेक महत्त्वाचे संकल्प जाहीर केले.
Source link
राजकीय अस्वस्थतेच्या चर्चांना पूर्णविराम!:शरद पवारांनी आमदार रोहित पवारांवर सोपवली 'रयत'च्या उत्तर विभागीय अध्यक्षपदाची धुरा