Headlines

नीट पेपर फोडणारे प्रमुख आरोपी पुण्याचे:एकमेकांपासून 1-2 KM च्या परिघात वास्तव्य; पुण्याचेच शिक्षक का? NTA वादाच्या भोवऱ्यात




नीट पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही प्राध्यापकांचे पुण्यात एकमेकांपासून एक ते दोन किलोमीटरच्या परिघात वास्तव्य होते. देशात फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी शिकवणारे हजारो तज्ज्ञ प्राध्यापक आहेत. पण त्यानंतरही नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी एकाच शहरातील 3 तज्ज्ञ प्राध्यापकांची निवड करण्यात आली. एनटीएच्या अधिकाऱ्यांनी असे का केले? यामागे त्यांचा काय हेतू होता? असे विविध प्रश्न आता या प्रकरणी उपस्थित होत आहेत. त्यामुळे संपूर्ण नॅशनल टेस्टिंग एजन्सीच आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आतापर्यंत पुण्यातील 4 जणांना अटक करण्यात आली आहे. यात पी व्ही कुलकर्णी, मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे व मनीषा हवालदार यांचा समावेश आहे. यापैकी कुलकर्णी हा केमिस्ट्रीचा तज्ज्ञ म्हणून एनटीएच्या समितीवर होता. तर मनीषा मांढरे व मनीषा हवालदार या दोन्ही प्राध्यापिका अनुक्रमे बायोलॉजी व फिजिक्स विषयाच्या तज्ज्ञ म्हणून पेपर सेटर समितीवर कार्यरत होत्या. हे तिन्ही आरोपी पु्ण्यातील शिवाजी नगर, डेक्कन व बुधवार पेठ या एक ते दोन किलोमीटरच्या परिघात शिक्षण संस्थेत किंवा क्लासमध्ये शिकवत होते. पुण्याच्याच तिघांची एनटीएवर निवड का? मनीषा हवालदार या बुधवार पेठेतील एका शाळेत शिकवत होत्या. त्या तिथे मुख्याध्यापिका होत्या. तर मनीषा मांढरे या शिवाजीनगर भागातील मॉडर्न महाविद्यालयात शिकवत होत्या. तर पी व्ही कुलकर्णी डेक्कन परिसरातील एका खासगी क्लासमध्ये शिकवत होते. हे तिन्ही ठिकाणे एकमेकांपासून जवळच आहेत. देशात रसायनशास्त्र, जीवशास्त्र व भौतिकशास्त्राचे हजारो प्राध्यापक आहेत. त्यानंतरही या तिघांचीच निवड एनडीएमध्ये का करण्यात आली? असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित होत आहे. या प्रकरणी एनटीएच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी, एनटीएमधील सर्वच मोठ्या पदांवरील अधिकाऱ्यांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. तिन्ही मनीषांचा एकमेकांशी संबंध काय? सूत्रांच्या माहितीनुसार, प्रा. मनीषा मांढरे व मुख्याध्यापिका मनीषा हवालदार या केवळ मैत्रिणी नव्हत्या, तर नीट पेपरफुटीच्या खेळातील एकमेकींच्या अत्यंत जवळच्या भागीदार होत्या. या दोन्ही मनीषा एकमेकींना चांगल्या ओळखत होत्या. त्यांच्या अनेकदा भेटीगाठी झाल्या होत्या. या भेटीगाठीतूनच देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य विकण्याचा घाट घातला गेला. मनीषा मांढरे व मनीषा वाघमारे यांची ओळख पार्लरमध्ये झाली. याच ओळखीतून हा कट आणखी पुढे गेला. मनीषा वाघमारेने विद्यार्थी व पालकांशी संपर्क साधून त्यांना मनीषा मांढरेकडे पाठवले. मनीषा हवालदारची एनटीएने फिजिक्स विषयाची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. त्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या अतिगोपनीय प्रक्रियात सहभागी होत्या. त्यामुळे त्यांची मुख्य प्रश्नांपर्यंत पोहोच होती. त्यांनी आपला पदाचा गैरवापर करत फिजिक्सचे प्रस्न मनीषा मांढरेसोबत शेअर केले. सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे की, या दोघींनी लीक केलेले प्रश्न व प्रत्यक्ष नीटच्या परीक्षेत आलेले प्रश्न अगदी हुबेहुब होते. पहिली, दुसरीच्या चौकशीतून तिसरी मनीषा जाळ्यात सीबीआयने शिवराज मोटेगावकर, पी व्ही कुलकर्णी, मनीषा वाघमारे व मनीषा मांढरे यांची कसून चौकशी केली. त्यातून मनीषा हवालदारचे नाव पुढे आले. त्यानुसार, सीबीआयने शुक्रवारी पुण्यातील शेठ हिरालाल सराफ प्रशालेत छापेमारी करत मनीषा हवालदार यांना अटक केली. विशेष म्हणजे मनीषा हवालदार अवघ्या महिन्याभरातच सेवानिवृत्त होणार होत्या. पण निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांच्या पापाचा घडा फुटला आणि आता त्या तुरुंगाची हवा खात आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *