Headlines

डॉ. पुष्पा लिमये यांच्या 'विविधा' पुस्तकाचे प्रकाशन:डॉ. वर्षा तोडमल यांच्या हस्ते, साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित




ज्येष्ठ शिक्षिका डॉ. पुष्पा लिमये लिखित ‘विविधा’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. प्रख्यात लेखिका व विचारवंत डॉ. वर्षा तोडमल यांच्या हस्ते हे प्रकाशन सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभेत पार पडले. यावेळी बोलताना डॉ. तोडमल यांनी सांगितले की, पूर्वीच्या काळी संदर्भ ग्रंथ मिळवून साहित्य निर्मिती करणे कठीण होते, तरीही अनेक लेखक व शिक्षिकांनी पुस्तके लिहिली. लेखक अक्षरांमधून वाचकांशी संवाद साधतात. सदाशिव पेठेतील श्री गोपाळ हायस्कूलच्या माजी प्राचार्या डॉ. पुष्पा लिमये यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ संपादक डॉ. आनंद हर्डीकर आणि लेखिका डॉ. पुष्पा लिमये व्यासपीठावर उपस्थित होत्या. डॉ. धर्मेंद्र शाह आणि खाजा शेख यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात सहभाग घेतला. डॉ. वर्षा तोडमल यांनी ‘विविधा’ पुस्तकाचे कौतुक करताना म्हटले की, यात साहित्य, संस्कृती, इतिहास आणि आत्मचरित्र असे बहुरंगी विषय वाचायला मिळतात. साहित्याच्या अनेक आशयधारा एकाच पुस्तकात आल्या आहेत. प्रत्येक लेख चिंतनाचा नवा सेतू असून, मराठी लेखन परंपरेचे समृद्ध चिंतन डॉ. पुष्पा लिमये यांनी यामाध्यमातून केले आहे. डॉ. आनंद हर्डीकर यांनी नमूद केले की, या पुस्तकात विविध लेखनप्रकारांचे संकलन आहे. ही साहित्यनिर्मिती लेखनकलेच्या प्रतिभेचे दर्शन घडवते आणि डॉ. लिमये यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख वाचकांना करून देते. डॉ. पुष्पा लिमये यांनी त्यांच्या ‘विविधा’ या पुस्तकाविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या की, यातील लेख ३० ते ३५ वर्षांपूर्वीचे किंवा त्याहूनही जुने आहेत. हे लेख अनेक मासिके आणि नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले होते. त्यावेळची परिस्थिती, आजूबाजूचे वातावरण, काही प्रसंग, प्रासंगिक प्रश्न आणि बातम्यांवरील प्रतिक्रिया या लेखांमधून उमटल्या आहेत. अशा लेखनापैकी प्रातिनिधिक लेखन ‘विविधा’ मध्ये समाविष्ट केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *