Headlines

विधान परिषद निवडणूक: आजपासून उमेदवारी अर्ज दाखल:अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी रणधुमाळी सुरू




अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी आज, सोमवार, २५ मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर हे या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात स्वतंत्र निवडणूक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून आहे. प्राप्त झालेल्या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवार, २ जून रोजी केली जाईल आणि त्याच दिवशी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ जून ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून, २२ जून रोजी मतमोजणी केली जाईल. उन्हाची तीव्रता आणि वातावरणातील बदलांमुळे यावेळी केवळ जिल्हा मुख्यालयातच नव्हे, तर उपविभागीय अधिकारी (SDO) स्तरावरही मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण सात ठिकाणी मतदान केंद्रे असतील. ही निवडणूक ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे घेतली जाते. यात उमेदवारांच्या नावापुढे शिक्का किंवा खूण न करता पसंतीक्रम नोंदवावा लागतो, त्यामुळे याला एकलसंक्रमण पद्धतीची निवडणूक म्हटले जाते. महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे सदस्य या निवडणुकीचे मतदार आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती यांनाही मतदानाचा अधिकार असतो, परंतु सध्या त्या सर्व जागा रिक्त आहेत. पक्षीय बलाबलानुसार, भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक १५० मतदार आहेत, तर काँग्रेस १२० मतदारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (३३), युवा स्वाभिमान (२६), प्रहार (२१), शिंदेसेना (१८) आणि बसप (०३) असे पक्ष मिळून एकूण २५१ मतदार आहेत. दुसरीकडे, काँग्रेसचे नैसर्गिक मित्र असलेल्या उद्धवसेनेचे २१ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ११ मतदार एकत्र केल्यास महाविकास आघाडीचा आकडा १५२ वर पोहोचतो. एमआयएम (१६), वंचित (७), सपा (२) आणि २५ अपक्षांपैकी काही जण त्यांना मदत करू शकतात, असा अंदाज आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *