Headlines

करमाळ्यात वादळी वाऱ्याने 6 एकर केळी बाग जमीनदोस्त:पूनवर येथील शेतकरी अरुण धुमाळ यांचे 25 लाखांचे नुकसान




करमाळा तालुक्यात सोमवारी दि. २५ मे रोजी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. पूनवर येथील केळी उत्पादक शेतकरी अरुण धुमाळ यांच्या सहा एकरांवरील केळी बागेला या वादळाचा जबर फटका बसला असून संपूर्ण केळी बाग भुईसपाट झाली आहे. या नुकसानीत त्यांचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दि. २५ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास वडगाव उत्तर, पूनवर, जातेगाव परिसरात अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या वाऱ्याच्या तडाख्याने अरुण धुमाळ यांच्या सहा एकरांवरील केळीची सर्व झाडे आडवी झाली. अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण बाग जमीनदोस्त झाल्याने धुमाळ कुटुंबीयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.विशेष म्हणजे गेल्या अकरा महिन्यांपासून मोठ्या मेहनतीने जपलेली ही केळी बाग अवघ्या एक महिन्यावर तोडीला आली होती. केळी विक्रीसाठी तयार होत असतानाच आलेल्या वादळाने संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरले. ऐन उत्पादनाच्या टप्प्यावर झालेले नुकसान पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. धुमाळ यांनी या सहा एकर केळी बागेसाठी जवळपास १३ लाख रुपयांचा खर्च केला होता. वाढता उत्पादन खर्च, पाणी व विजेच्या समस्यांमध्ये मोठ्या कष्टाने उभी केलेली बाग काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानीची शासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामा करावा व शेतकऱ्याला त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ^ऐन उन्हाळ्यात शेती पंपाची वीज व पाण्याचा गंभीर प्रश्न असतानाही १३ लाखांहून अधिक खर्च करून केळीची बाग जपली होती. सहा एकरातील संपूर्ण बाग तोडणीला आली होती. अवघ्या एका महिन्यात केळी विक्रीला गेली असती; मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे काही मिनिटांतच संपूर्ण बाग जमीनदोस्त झाली. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी. अरुण धुमाळ, केळी उत्पादक शेतकरी अकरा महिन्यांची मेहनत काही मिनिटांत उद्ध्वस्त



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *