Headlines

येरवडा कारागृहात तंबाखू मागण्यावरून कैद्याला मारहाण:दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल




येरवडा कारागृहात तंबाखू मागण्यावरून झालेल्या वादातून एका कैद्याला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या कैद्यांची नावे अजय शंकर राठोड आणि संतोष सुरेश भालेराव अशी आहेत. वरिष्ठ कारागृह अधिकारी रेवणनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक दोन परिसरातील स्वच्छतागृहाजवळ कैदी शुभम पोखरकर थांबला होता. तो स्वच्छतागृहात जात असताना राठोड आणि भालेराव यांनी त्याला अडवून तंबाखूची मागणी केली. तंबाखूवरून झालेल्या वादानंतर राठोड आणि भालेराव यांनी शुभम पोखरकर याच्या डोक्यात जेवण वाढण्यासाठी वापरले जाणारे छोटे माप आणि प्लास्टिकची बादली मारली. यात पोखरकर जखमी झाला. कैद्यांमधील हाणामारी पाहून कारागृहातील रक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि राठोड व भालेराव यांना ताब्यात घेतले. या घटनेची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक कुंदन सत्रे पुढील तपास करत आहेत. येरवडा कारागृहात यापूर्वीही कैद्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना आणि गैरप्रकार रोखण्यासाठी कारागृहाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. भरदिवसा घरफोडी- सदनिकेतून दोन लाखांचा मुद्देमाल चोरी सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड, तसेच लॅपटाॅप असा एक लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना कोथरूड भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत एकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पौड रस्त्यावरील शीलाविहार काॅलनीतील एका सोसायटीत राहायल आहेत. तक्रारदार आणि कुटुंबीय हे कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड, तसेच लॅपटाॅप असा मुद्देमाल लांबवून चोरटे पसार झाले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास तक्रारदार कामावरुन परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस हवालदार एस दगडे तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *