![]()
ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईदचा सण मालेगाव शहर व परिसरात गुरुवारी (दि.२८) शांततेत साजरा करण्यात आला. कॅम्प रोडवरील पोलिस कवायत मैदानावर सकाळी सव्वा सात ते आठ वाजेदरम्यान मुख्य नमाज मौलाना शफीक अहमद फैलाई यांच्या प्रमुख उपस्थितीत अदा करण्यात आली.
.
याचबरोबर शहरातील विविध १३ इदगाह मैदाने आणि सुमारे ५० मशिदींमध्येही सामूहिक नमाज पठण करण्यात आले. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तत्पूर्वी प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी नितीन सदगीर, पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, तहसीलदार विशाल सोनवणे तसेच शांतता व एकात्मता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मौलाना फैलाई यांचा सत्कार केला. यावेळी विविध धर्मिय नागरिकांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.
महापालिकेकडून कुर्बानीसाठी कायमस्वरूपी एका कत्तलखान्यासह २५ तात्पुरत्या कत्तलखान्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
गोवंश हत्याबंदी कायद्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घेत शहरातील संवेदनशील भागांत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती.
दरम्यान, कॅम्प रोडवरील मुख्य नमाजानंतर होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक शाखेकडून चार तासांसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता. मोसम पूल ते करवा हॉस्पिटल तसेच कॉलेज स्टॉप ते एकात्मता चौक दरम्यानचे रस्ते बंद ठेवण्यात आले होते. मोसम पूल, एकात्मता चौक, सार्वजनिक वाचनालय आणि कॉलेज स्टॉप परिसरात बॅरिकेडिंग केले होते. आग्रा रोडवरील वाहतुकीतही तात्पुरता बदल करण्यात आला होता. वाहतूक नियंत्रणासाठी दोन अधिकारी व ३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
प्रतिनिधी | मनमाड शहर आणि परिसरात मुस्लिम बांधवांनी ईद-उल -अजहा अर्थात बकरी ईदचा सण उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला. यानिमित्त शहरातील दोन्ही ईदगाह मैदानांवर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. देशात शांतता, सद्भावना आणि एकता नांदावी तसेच भरपूर पाऊस पडावा, यासाठी विशेष दुवा पठण करण्यात आले. गुरुवारी सकाळी शहरातील जुनी ईदगाह तसेच आयुडीपी परिसरातील डॉ. गुजराथी हॉस्पिटलच्या मागील नवीन ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. ईदगाह मैदानावर मौलाना असलम रजवी यांनी नमाज पठणाचे नेतृत्व केले. नमाज पठणानंतर देशात शांतता, सद्भावना आणि एकता नांदावी तसेच सर्वत्र चांगला पाऊस पडावा, यासाठी प्रार्थना व दुवा पठण करण्यात आले. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कब्रस्तानमध्ये जाऊन आपल्या पूर्वजांचे स्मरण केले. बकरी ईदनिमित्त शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले. दरम्यान, शहर पोलिस आणि मनमाड नगरपालिका प्रशासनातर्फे दोन्ही ठिकाणी आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गोहत्या होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन मुख्य नमाजात मौलाना शफीक अहमद फैलाई यांनी मुस्लिम बांधवांना शरीयतनुसार कुर्बानी देण्याचे आवाहन केले. इतर धर्मियांच्या भावना दुखावतील असे कोणतेही कृत्य करू नये तसेच कुर्बानीदरम्यान गोहत्या होणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.