.

चडचणच्या साडी व्यापाऱ्याचा पूर्वीचा नोकरच ३ कोटींच्या दरोड्याचा मास्टरमाइंड निघाला. टेंभुर्णी-करमाळा रस्त्यावर फिल्मी स्टाइलने टेम्पो अडवून व्यापाऱ्याच्या व्यवस्थापकाला लुटणाऱ्या टोळीला टेंभुर्णी पोलिसांनी अवघ्या पंधरवड्यात जेरबंद केले. अटक केलेल्या ४ आरोपींकडून तब्बल २ कोटी ७० लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. विशेष म्हणजे, चोरीच्या पैशांवर मोबाइल खरेदी तर मोडनिंब, बार्शी येथील लोकनाट्य कला केंद्रात लाखो रुपयांची उधळण करत मौजमजा केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील साडी व्यापारी बाहुबली मुत्तीन यांचे मॅनेजर धुंडाप्पा खलाटे हे ११ मे रोजी सुरत येथे रोख रक्कम घेऊन निघाले होते. त्यांनी आयशर टेम्पोच्या कॅबिनवरील ताडपत्रीत २ पोत्यांमध्ये ३ कोटी रुपयांची रोकड ठेवली होती. टेंभुर्णी-करमाळा मार्गावर पहाटेच्या सुमारास स्विफ्ट कार आडवी लावून टेम्पो अडवून चार जणांनी चाकूचा धाक दाखवत चालक व सहका-यास मारहाण करुन नोटांनी भरलेली पोती घेऊन चोरटे पसार झाले होते. अटकेतील चौघा आरोपींना २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. जप्त २ कोटी ७० लाख रुपयांसह ऐवज न्यायालया समोर सादर केला. न्यायालयाने सदर रकमेचा अहवाल सादर करण्याचे आदेश टेंभुर्णी पोलिसांना दिले आहेत.
सिद्धेश्वर माने, अजित सुर्वे, शुभम पाटील व सूरज उन्हाळे या ४ आरोपींना अटक करण्यात आली तर विकी गिड्डे याचा शोध सुरू आहे.
यामध्ये २ कोटी ६२ लाखांची रोकड जप्त केली आहे तर ५ लाख ४९ हजारांचे सोने, २ लाख ६१ हजारांचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस माहितीद्वारे अजित सुर्वे (वय २६,रा.पांढरेवस्ती,अर णरोड) व सिद्धेश्वर माने (वय ३४, रा.पालखीमार्ग) याला ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याचा उलगडाझाला.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सिद्धेश्वर माने हा आगोदर चडचणच्या व्यापाऱ्याकडे टेम्पो चालक म्हणून कापड खरेदीसाठी चडचण ते सुरत, गुजरातला कोट्यावधी रुपये रोख घेऊन जात होता. त्याने ते काम काही दिवसांपूर्वी सोडले होते. घटनेच्या दिवशी त्याने टेम्पो वर मोडनिंबमध्ये पाळत ठेऊन होता. टेम्पो सुटताच टेंभुर्णी जवळ त्याने सहकाऱ्यांच्या मदतीने रोकड लुटली. व्यापाऱ्याच्या माहितीवरुन पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून चोरी उघड केली.
. टेम्पोतील पैसे लुटल्यानंतर चौघे आरोपी करकंब तुळशी परिसरातील माळरानावर गेले. तिथे सिद्धेश्वर माने याने १ कोटी २० लाख रुपये, अजित सुर्वे याने ६५ लाख, शुभम पाटील याने १ कोटी २५ लाख रुपये तर चालक विकी गिड्डे यास १० लाख रुपये अशी सर्वांनी मिळून वाटणी केली होती. . सदर रक्कम लुटल्यानंतर सिद्धेश्वर माने याने त्यांचे पोखरापूर येथील भाऊजी सूरज उन्हाळे यांच्याकडे निम्मे पैसे तर पुणे येथे स्वारगेट, पुणे परिसरात राहत असलेल्या उन्हाळे यांची पत्नी उन्हाळे यांच्या घरामध्ये निम्मे पैसे ठेवले होते. . शुभम पाटील याने दरोड्यामध्ये लुटलेली रक्कम घरातील कपाटात, बेडच्या खाली, ज्वारीच्या कणकीमध्ये ठेवलेली होती. सर्वांनी आयफोन खरेदी केले. लवंगी मिरची संगीत बारी, भूम, टेंभुर्णी, परीते, मोडनिंबच्या लोकनाट्य कला केंद्रात ३० लाखांपैकी काही पैसे उधळून मौज केली.