![]()
अहिल्यानगर आपला दवाखाना हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी आणि जनतेच्या हक्काचा उपक्रम आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची जबाबदारी आरोग्य विभागाने गांभीर्याने पार पाडलीच पाहिजे. प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये दररोज किमान १०० ते १५० रुग्णांची तपासणी (ओपीडी) झालीच पाहिजे. नागरिकांना सर्व औषधोपचार मोफत उपलब्ध असल्याने, कर्मचाऱ्यांनी स्वतः वस्त्यांमध्ये जाऊन या सुविधांबाबत जनजागृती करावी, असे प्रतिपादन नाशिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांनी केले. अहिल्यानगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, डॉ. दिलीप बागल यांच्यासह शहरातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत डॉ. आहेर यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून प्रशासनाला सतर्क केले. शहरात जन्मलेल्या प्रत्येक बालकाला तातडीने ‘झिरो डोस’ मिळालाच पाहिजे, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहता कामा नये. आरोग्य केंद्रांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील ‘हाय रिस्क’ (जोखमीच्या) गरोदर मातांचा शोध घेऊन त्यांची नियमित तपासणी करावी. बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आशा सेविकांनी घरोघरी जाऊन नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी, याचे पालकांना धडे द्यावेत, अशा कडक सूचना त्यांनी दिल्या. तसेच, मुलींना दिल्या जाणाऱ्या कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश त्यांनी दिले. प्रत्यक्ष “ऑन द स्पॉट’ पाहणी होणार आरोग्य कर्मचाऱ्यांना थेट इशारा देताना डॉ. आहेर म्हणाले, मी आता केवळ कागदोपत्री आढावा घेणार नाही. दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मी स्वतः अहिल्यानगरमध्ये येऊन प्रत्यक्ष आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देणार आहे. तिथे नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांची ऑन द स्पॉट पाहणी केली जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे आणि प्रामाणिकपणे काम करावे.” तसेच, शहर टीबीमुक्त करण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आशा सेविकांना मिळणार विशेष प्रशिक्षण ^ नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांनी दिलेल्या सूचनांची मनपा प्रशासन गंभीरतेने अंमलबजावणी करेल. आरोग्य सेवा प्रत्येक घराघरापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आशा सेविकांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी आशा सेविकांची विशेष कार्यशाळा घेऊन त्यांना आवश्यक ते सर्व तांत्रिक प्रशिक्षण दिले जाईल. मनपा नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. – नागेंद्र मुक्तेकर, अतिरिक्त आयुक्त, मनपा अहिल्यानगर.
Source link
प्रत्येक केंद्रावर रोज 150 रुग्णांची ओपीडी हवीच:हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, "आपला दवाखाना'' प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा; डॉ. कपिल आहेर यांचे आदेश