![]()
बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि पर्समधील रोख रक्कम चोरणाऱ्या मध्य प्रदेशातील सहा महिलांच्या आंतरराज्यीय टोळीला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि १० मोबाईल फोन असा सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने केलेल्या सहा चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या दोन गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना या महिलांच्या टोळीबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळांसह पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली. पोलिसांनी आरोपींच्या येण्या-जाण्याच्या संभाव्य मार्गांवरील सुमारे ५० किलोमीटर परिसरातील १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. चित्रफितींचे बारकाईने विश्लेषण आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना या महिलांच्या हालचालींची माहिती मिळाली. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी पोलिस पथकाने संगमवाडी येथील पार्किंग क्रमांक तीन येथे सापळा रचला. सर्व आरोपी महिला मध्य प्रदेशात पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सहा जणींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये निशा शांतनू सिसोदिया (३०), प्रिया आसिक सिसोदिया (३४), पूनम प्रदीप सिसोदिया (२७), वर्षा कमल सिसोदिया (३५), आसना रघुवीर सिसोदिया (३२) आणि सोनिका निरोत्तम सिसोदिया (३७) यांचा समावेश आहे. यापैकी निशा सध्या आळंदी देवाची परिसरात राहत होती, तर अन्य महिलांचे मूळ पत्ते मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कडिया, गुलखेडी व आसपासच्या परिसरातील आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, ही टोळी बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी महिलांना लक्ष्य करत होती. गर्दीत धक्काबुक्कीचा फायदा घेत गळ्यातील मंगळसूत्र लंपास करणे किंवा पर्समध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरणे, अशी त्यांची कार्यपद्धती होती. चोरी केल्यानंतर संशय येऊ नये म्हणून सर्व महिला वेगवेगळ्या दिशेने पसार होत असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. आरोपींकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि १० मोबाईल फोन असा सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच अन्य शहरांमध्ये आणखी किती चोरीच्या घटना केल्या आहेत, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे आणि पोलिस कर्मचारी श्रीनाथ कांबळे करीत आहेत.
Source link
बाजारात महिलांना लुटणारी मध्य प्रदेशातील टोळी पकडली:150 हून अधिक सीसीटीव्ही तपासून 7 लाखांचा ऐवज, 10 मोबाईल जप्त; 6 गुन्हे उघड