Headlines

गोंदियात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून केला खून:दोघांना अटक, गळ्यावरील ओरखड्यांनी उघड केला कट




गोंदियामध्ये कौटुंबिक वाद आणि अनैतिक संबंधाच्या वादातून एका 44 वर्षीय व्यक्तीचा गळा दाबून खून करण्यात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोदिंयामधील कुडवा परिसरात हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी मृताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. राजेंद्र कटरे असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. 27 तारखेला कुडवा येथील छोटा हनुमान मंदिराजवळ राजेंद्र कटरे यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्यावेळी स्थानिकांनी ही माहिती राजेंद्र यांच्या बहिणीला दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या बहिणीला भावाच्या गळ्यावर नखांचे ओरखडे आणि गळा दाबल्याच्या खुणा दिसल्या. त्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नसल्याचा संशय येऊन त्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पत्नीचे गेल्या दीड वर्षांपासून तरुणाशी होते प्रेमसंबंध बहिणीने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात आला. यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. मृत राजेंद्रची पत्नी अनिता कटरे आणि आरोपी संजय लिल्हारे यांच्या गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. याच अनैतिक संबंधांच्या कारणावरून राजेंद्र आणि अनिता यांच्यात घरात वारंवार वाद आणि भांडणे होत. या वादाला आणि प्रेमात अडसर ठरत असल्याने अनिताने आपल्या प्रियकरासह राजेंद्र यांचा गळा दाबून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांकडून दोघांना अटक रामनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103 (1) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे अधिक तपास करत आहेत. या घटनेने कुडवा परिसरात खळबळ उडाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *