![]()
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. एकीकडे महायुतीमध्ये जागावाटपाबाबत अद्याप चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे सोलापुरातून या निवडणुकीसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी हा पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही, शिवसेना शिंदे गटाचे नेते रमेश बारसकर यांनी या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून, त्यात सहभाग घेतल्याशिवाय त्याला शोभा येत नाही, अशी प्रतिक्रिया बारसकर यांनी यावेळी दिली. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा उमेदवारी अर्ज भरला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात महायुतीचे सरकार असले तरी, सोलापूर जिल्ह्यात भाजपचे नेते शिवसेनेला सवतीची वागणूक देत असल्याचा गंभीर आरोप रमेश बारसकर यांनी केला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कोणताही निधी न देणे, तसेच कोणत्याही समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी न देणे अशा प्रकारांमुळेच निवडणुकीच्या माध्यमातून आपली ताकद आजमावण्यासाठी आपण हा अर्ज भरल्याची माहिती त्यांनी दिली. असे असले तरी, या निवडणुकीबाबत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे जो अंतिम निर्णय घेतील, तोच आदेश आपल्यासाठी शिरोधार्य असेल, असेही त्यांनी शेवटी नमूद केले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वांना सोबत घेऊन चालावे,’ असे सूचक वक्तव्य कालच केले होते. या पार्श्वभूमीवर, आज शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या सर्व घडामोडींवर भाजपची नेमकी काय भूमिका असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Source link
सोलापुरात शिवसेना शिंदे गटाकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल:भाजपचे वर्चस्व असतानाही रमेश बारसकर निवडणूक लढणार? काय म्हणाले बारसकर?