Headlines

मेळघाटातील ब्रिटीशकालीन ऐतिहासिक यंत्रांचे संग्रहालय व्हावे:इंटॅकच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना घातले साकडे




मेळघाटात १०० ते १३० वर्षे जुन्या काही मशीन, लोखंडी चाके असा ऐतिहासिक ऐवज काही ठिकाणी पडून दिसतो. या मशीनचा ब्रिटिशांनी रस्ते बांधणी, सागवान लाकूड कापणे व बाहेर काढणे अशा कामासाठी उपयोग केला होता. ही मशीन आज उपयोगात नसल्याने पडून आहेत. मात्र त्यांचा इतिहास जाणून घेतल्यास तो फार रंजक आहे. ही मशीन एकत्र करून त्याचे एक संग्रहालय तयार करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन इंटॅक अमरावती चॅप्टरतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जागतिक संग्रहालय दिवस अलिकडेच जगभर साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सदर संघटनेने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनीही या विषयावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. इंटॅक संस्थेने अशा वस्तूंची यादी करून सविस्तर प्रस्ताव तयार करून द्यावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी इंटॅकचे सदस्य अँड. राजमेहेर निशाने, सचिन पेठे, सौरभ जवंजाळ, अंकुश गावंडे आदींची उपस्थिती होती. हे संग्रहालय तयार झाल्यास मेळघाटातील पर्यटकांना व अभ्यासकांना एक नवे दालन खुले होईल, असे मत इंटॅक अमरावती चॅप्टरचे संयोजक डॉ. जयंत वडतकर यांनी व्यक्त केले आहे. सातपुडा पर्वतरांगेतील मेळघाटचे जंगल हे वन व वन्यजीव संपदेने नटलेले मध्य भारतातील एक महत्त्वपूर्ण जंगल आहे. या जंगलातील वनव्यवस्थापन प्रथमतः १८५५ साली सुरू झाले. तो ब्रिटिश काळ होता. त्यानंतर ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी रस्ते व डाकबंगले बांधले. येथील सागाचे लाकूड मोठ्या प्रमाणात रेल्वे व इतर बांधकामासाठी देशभरात जाऊ लागले. रस्ते बांधणी व इतर कामासाठी त्यांना यंत्रांची गरज वाटू लागली होती. युरोपात त्याचवेळी यांत्रिक युगाची सुरुवात झाली. वाफेवर चालणारे इंजिन तयार होऊ लागले होते. या काळात मेळघाटातसुद्धा काही यंत्रे आणली गेली. मेळघाटचे अभ्यासक व मानद वन्यजीव रक्षक डॉ. वडतकर यांनी मेळघाटात आज पडून असलेल्या जुन्या मशीनचा मागोवा घेऊन अभ्यास केला आहे. त्यांच्या मते मेळघाटातील पहिले यंत्र १८८७ दरम्यान आणले गेले. ते ओढून चालणारे रोलर असावे. मेळघाटच्या सीमेवरील तापी नदीकाठी असलेल्या रंगुबेली या विश्रामगृहाजवळ रोलरचे एक चाक पडून आहे. हे चाक पाहून याचा रोलर मशीन कुठे गेला, अशी शंका येऊ शकते. मात्र असे वजनदार चाक त्यावेळी रस्ता दबाई करण्यासाठी वापरले जात असे. या चाकावर जॉर्ज गहागन कंपनी, बॉम्बे असे कंपनीचे नाव आहे. १९०७ हे तयार करण्याचे वर्षही लिहिले आहे. असेच एक रोलरचे चाक अकोट विभागातील धारगडजवळसुद्धा आहे. हे रोलर व्हील १८८७ चे आहे. दुसरे एक इंजिन सेमाडोह ढाना गावाजवळील सिपना नदीजवळ रस्त्याच्या कडेला जमिनीत रुतून बसलेले दिसते. रस्ता तयार करण्यासाठी उपयोगात येणारे रोड रोलर येथे येणारे पहिले यंत्र असावे. त्यानंतर रस्त्यासाठी लागणारा दगड फोडण्याचे मशीन आले असावे. एकीकडून पीठ गिरणीला असते तशी चाळी आहे. बाजूला वजनदार चाक आहे. मधल्या भागात वेगवेगळ्या आकाराची छिद्रे असलेली लांब गोल चाळणी आहे. दुसऱ्या टोकाला मोठे, भारी पोलादी चाक आहे. हे मशीन रस्ता बांधणीसाठी दगड फोडण्याचे मशीन (स्टोन क्रशर) आहे. मेळघाटात ब्रिटिश बांधकाम विभागाचे काम सुरू झाल्यावर १९१० नंतर ते येथे आणले गेले असावे. अमेरिकेतील फेरल फाउंड्री कंपनी ‘स्टोन ब्रेकर’ नावाने अशा प्रकारचे मशीन १९१० च्या दरम्यान तयार करीत असे. त्यावरून हे मशीन मेळघाटात कधी आले, याची कल्पना करता येते. निर्मिती काळाचा मागोवा शेतीच्या कामासाठी आणलेल्या स्टीम प्लोविंग इंजिन मशीनच्या निर्मिती काळाचा मागोवा घेतल्यास काही मशीन्स मेळघाटात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस किंवा विसाव्याच्या सुरुवातीस पोहोचल्या असाव्यात. शेतीच्या कामासाठी वापरले जाणारे “स्टीम प्लोविंग इंजिन” येथे सुमारे १०० वर्षांपूर्वी आले असावे. हे येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण असे मशीन आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *