![]()
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), खडकवासला येथे शनिवारी 150 व्या तुकडीचा पासिंग आऊट परेड (POP) समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात एकूण 353 कॅडेट्सनी आपले तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र दिवेदी यांनी या संचलनाची पाहणी केली. क्षेत्रपाल मैदानावर झालेल्या या संचलनाचे नेतृत्व कॅडेट मयांक चौधरी याने केले. ‘कदम कदम बढाए जा’ या सुमधुर धूनवर एकूण 1250 कॅडेट्सनी पथसंचलन केले. यावेळी तीन चेतक हेलिकॉप्टर, सुपर डिमेनो विमान आणि सुखोई विमानांनी मैदानावरून उड्डाण करत मानवंदना दिली. उत्तीर्ण झालेल्या 353 कॅडेट्सपैकी 292 जण लष्करात, 43 जण नौदलात आणि 81 जण वायुदलात पुढील एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी रवाना होतील. भारताच्या मित्रदेशांमधील 24 कॅडेट्सनीही यावर्षी एनडीएमध्ये यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केले. कॅडेट रोहित काजला याला सुवर्णपदक, कॅडेट पीयूष रौतला याला रौप्यपदक तर कॅडेट साहिल शर्मा याला कांस्यपदक प्रदान करण्यात आले. चार्ली स्क्वॉड्रनला प्रतिष्ठित ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ बॅनर’ हा पुरस्कार मिळाला. याप्रसंगी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र दिवेदी यांच्यासह लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल संदीप जैन, एनडीएचे कमांडंट व्हाईस ऍडमिरल अनिल जग्गी आणि डेप्युटी कमांडंट एअर व्हाईस मार्शल राजेश वर्मा उपस्थित होते. कॅडेट्सना मार्गदर्शन करताना जनरल उपेंद्र दिवेदी म्हणाले की, 42 वर्षांपूर्वी त्यांनी स्वतः एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केले होते आणि आज या ठिकाणी उपस्थित राहणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. 12 मित्रदेशांमधील 24 कॅडेट्सनी प्रशिक्षण पूर्ण करणे हे इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ‘ऑपरेशन सुंदर’ हे कोणत्याही हल्ल्याला खंबीरपणे प्रत्युत्तर देण्याचे प्रतीक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कॅडेट्सनी कौशल्य, सामर्थ्य, अनुकूलनक्षमता आणि सर्वांगीण दृष्टिकोन हे गुण आत्मसात करणे आवश्यक आहे. महिला कॅडेट्सही खडतर प्रशिक्षण पूर्ण करत असून, त्यांना पुरुष कॅडेट्सइतकाच समान दर्जा आहे. युद्धक्षेत्रात महिला आता नेतृत्व करण्यात मागे नाहीत, ही कौतुकास्पद बाब असल्याचे जनरल दिवेदी यांनी सांगितले.
Source link