Headlines

अनिकेत तटकरेंसाठी युती धर्म पाळा:एकनाथ शिंदेंच्या आपल्या आमदारांना सूचना, कोकण विधान परिषदेची जागा गेली राष्ट्रवादीकडे




विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीत सुरू असलेला पेच अखेर सुटला असून, प्रतिष्ठेची मानली जाणारी कोकणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला आली आहे. या निर्णयामुळे शिवसेनेत निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेतला असून, “युतीधर्म पाळा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणा,” अशा कडक सूचना आपल्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोकण विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेनेही प्रबळ दावा केला होता. मात्र, दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाच्या चर्चेनंतर ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाला. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोकणातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, निलेश राणे आणि विकास गोगावले उपस्थित होते. बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, महायुतीची एकजूट टिकवण्यासाठी सर्वांनी अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारी अर्जावेळी उपस्थित राहावे. बंडखोरीचा पेच सुटणार का? शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर भरत गोगावले यांचे चिरंजीवही या जागेसाठी इच्छुक होते. आता पक्षादेशानंतर जुईली दळवी आपला अर्ज मागे घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, “आम्ही एकनाथ शिंदेंच्या निर्णयाबाहेर जाणार नाही,” अशी प्रतिक्रिया देत भरत गोगावले यांनी सबुरीची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, खासदार सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख ‘दिलखुलास नेतृत्व’ असा करत त्यांचे आभार मानले आहेत. महायुतीचा ‘११-४-२’ फॉर्म्युला निश्चित विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या जागावाटपात भारतीय जनता पक्षाने आपला वरचष्मा राखला आहे. भाजप: ११ जागा, शिवसेना: ४ जागा (ठाणे, नाशिक, परभणी आणि यवतमाळ), आणि राष्ट्रवादी: पुणे आणि कोकण अशा दोन जागांवर निवडणूक लढणार आहे. सुरुवातीला ७ जागांसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यामुळे शिवसेनेत काहीशी नाराजी असली, तरी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री शिंदे कार्यकर्त्यांची समजूत काढत असल्याची माहिती समोर येत आहे. पालकमंत्रीपदाची चर्चा मात्र अधांतरी कोकण विधान परिषदेची हक्काची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्यानंतर, रायगडचे पालकमंत्रीपद पुन्हा शिवसेनेकडे येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. मात्र, आजच्या बैठकीत किंवा महायुतीच्या निर्णयांत याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता देण्यात आलेली नाही. हे ही वाचा… अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदांमुळे योजनांचा बोजवारा:आमदार रईस शेख यांचे सुनेत्रा पवारांना पत्र, केल्या विविध मागण्या राज्यातील अल्पसंख्याक विकास विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी मुस्लीम आमदारांची पहिलीच महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी विभागातील रिक्त पदे भरण्यासह १२ प्रलंबित मागण्यांचे पत्र उपमुख्यमंत्री पवारांना धाडले आहे. “विभागातील ४०६ रिक्त पदांमुळे योजनांच्या अंमलबजावणीत अडथळा येत असून, ही पदे तातडीने भरण्यात यावीत,” अशी प्रमुख मागणी शेख यांनी केली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *