![]()
वसमत तालुक्यातील कवठा शिवारात विज कपंनीचे रोहित्र बसविण्याचे काम सुरु असतांना एका कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ता. १५ घडली आहे. या प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी कामगाराचा मृतदेह वसमतच्या विज कंपनीच्या कार्यालयात आणून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर याप्रकरणात वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विज कंपनीकडून कवठा शिवारात रोहित्र बसविण्याचे काम सुरु होते. त्यानुसार आज सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास कवठा शिवारात काम सुरु करण्यात आले होते. यावेळी अधिकृत परमीट घेऊन विज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यानंतर या कामावरील कामगार बाबुजी जाधव (४२, रा. बोराळा) हे काम करण्यासाठी खांबावर गेले असताना अचानक विज पुरवठा सुरु झाला. त्यामुळे बाबुजी यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यातच ते खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. सदर घटना विज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप करून मृत बाबुजी यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह थेट विज कंपनीच्या वसमत येथील कार्यालयात आणला. या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वसमत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार गजानन भोपे यांच्या पथकाने विज कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. दरम्यान, पोलिस व विज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मृत बाबुजी यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले तसेच त्यांच्या वारसांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व गावांमधून विज कर्मचारी सक्रिय करावेः सतीष पाटील महागावकर, पदाधिकारी संभाजी ब्रिगेड वसमत तालुक्यातील सर्व गावामधून विज कर्मचारी सक्रिय करावेत. तसेच झिरो लाईनमन हा प्रकार बंद करून विज कर्मचाऱ्यांनी स्वतः त्यांच्या भागात विज पुरवठ्याची कामे करावीत. मृत बाबुजी यांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.
Source link
कवठा शिवारात रोहित्र बसविताना विजेच्या धक्याने कामगाराचा मृत्यू:संतप्त नातेवाईकांनी मृतदेह आणला वसमतच्या विज कंपनीच्या कार्यालयात