![]()
वर्धा जिल्ह्याची ओळख ठरलेल्या आणि देशभरात आपल्या दर्जेदार उत्पादनांमुळे प्रसिद्ध असलेल्या गो संवर्धन गोरस भंडारवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) केलेली कारवाई ही सूडबुद्धीने आणि आकसापोटी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 31 मे रोजी एफडीए अधिकाऱ्यांनी गोरस भंडार येथे धाड टाकून दूध व दुग्धजन्य पदार्थांचे नमुने घेतले. मात्र नमुन्यांचा अहवाल येण्यापूर्वीच उत्पादन व विक्रीवर बंदी घालत माल सील करण्यात आला. कोणताही अंतिम तपास अहवाल हाती नसताना संस्थेला दोषी ठरविण्याची घाई प्रशासनाने का केली, असा संतप्त प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. महात्मा गांधी यांच्या विचारधारेतून उभ्या राहिलेल्या गोरस भंडारने मागील नऊ दशकांपासून विश्वासार्हतेची परंपरा कायम राखली आहे. संस्थेच्या गोरसपाकसह विविध उत्पादनांना देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. आजपर्यंत ग्राहकांकडून कोणतीही गंभीर तक्रार नोंदली गेली नसताना एफडीएच्या अधिकाऱ्यांनी थेट संस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईचा सर्वात मोठा फटका जिल्ह्यातील हजारो दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. गोरस भंडारला दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे दूध अचानक बंद पडल्याने आता दूध विकायचे कुठे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच नैसर्गिक संकटे, वाढते चारा-दाण्याचे दर आणि महागाईमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असताना प्रशासनाच्या या कारवाईने जखमेवर मीठ चोळल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांकडून येणाऱ्या दुधाची कोणतीही स्वतंत्र तपासणी न करता पुरवठा थांबविण्यात आला. परिणामी ग्राहकांच्या मनातही संशयाचे वातावरण निर्माण झाले असून विश्वासाचे प्रतीक असलेल्या संस्थेवर डाग लावण्याचे काम अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गोरस भंडारवर सूडबुद्धीने कारवाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गजानन लोखंडे, सुहास पाटील, सचिन टाके, दिलीप कोकाटे, बाबाराव गायकवाड, गोविंदराव डोळे, कमलाकर शेंडे, बाळकृष्ण राऊत, उमेश डाखाळे, शिवराम खडसकर, दशरथ मोहदुरे, मधुकरराव भोयर, गजानन उमाटे, अंकुश येंडे, विनोद नांदे, मधुकर टेकाळे, दिवाकर रोडे, पांडूरंग भुसारी, चंद्रशेखर कामडी, प्रमोद कामडी, श्रीराम मगर, तुकाराम भुसारी यांच्यासह अनेक दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
Source link
वर्ध्याच्या प्रसिद्ध 'गोरस भंडार'वरील एफडीएची कारवाई सूडबुद्धीने!:दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा गंभीर आरोप, मंत्री पंकज भोयरांकडे कारवाईची मागणी