![]()
प्रतिनिधी | अमरावती जिल्ह्यातील अतिदुर्गम मेळघाट परिसरातील आदिवासी व ग्रामीण महिलांच्या कौशल्याला आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे. ऑस्ट्रेलियन विचारवंत बार्बरा ओ नील यांनी ‘कुटीर’ साडी परिधान करुन एका कार्यक्रमात हजेरी लावल्यामुळे ही मान्यता अधिक घट्ट झाली आहे. धारणी तालुक्यातील मांडू येथील महिला कारागिरांनी आपल्या कष्ट, जिद्द आणि कलाकुसरीच्या बळावर तयार केलेल्या या उत्पादनाला मिळालेली ही जागतिक पसंती महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण ठरली आहे. या उपक्रमातून मेळघाटातील महिलांना रोजगारच मिळाला नसून, त्या स्वावलंबन आणि सन्मानाने शाश्वत विकासाकडे पाऊल टाकत आहेत. त्यासाठी खादी व ग्रामोद्योगचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विकेंद्रित सोलर चरखा समूह कार्यक्रमांतर्गत कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या महिलांनी ही साडी तयार केली आहे. ‘कुटीर’ ब्रँडच्या या साडीने जागतिक स्तरावर आपला प्रभाव पाडला आहे. दिल्ली येथे आयोजित ”लिव्ह वेल, लिव्ह नॅचुरली” या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध आरोग्य व नैसर्गिक जीवनशैली प्रचारक बार्बरा ओ”नील यांना ही सोलर चरखा कापडापासून तयार केलेली आकर्षक साडी भेट देण्यात आली होती. या साडीची उत्कृष्ट गुणवत्ता, सौंदर्य आणि अप्रतिम हस्तकला पाहून बार्बरा ओ”नील इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनी मुंबई येथील त्यांच्या पुढील मोठ्या कार्यक्रमात हीच साडी परिधान करून उपस्थितांना संबोधित केले. भविष्यातील वाटचाल आणखी व्यापक करु ‘मेळघाटातून जगभर’ हा प्रवास आता स्वप्न राहिले नसून, ग्रामीण महिलांच्या हातांनी विणलेली ती एक प्रेरणादायी यशोगाथा बनली आहे. ज्यामुळे ‘कुटीर’ ब्रँडला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे. भविष्यात या वाटचालीला अधिक व्यापक स्वरुप प्राप्त करुन दिले जाईल. – प्रदीप चेचरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, अमरावती.
Source link
मेळघाटातील ‘कुटीर'' साडीला जागतिक मान्यता:ऑस्ट्रेलियन विचारवंत बार्बरा ओ''नील यांनी परिधान केल्यामुळे मिळाला सन्मान