Headlines

दहा दिवसीय मुलींच्या संस्कार शिबिराचा उत्साहात समारोप:साईनगरमध्ये विश्व जागृती मिशन व रामाश्रयी ट्रस्टतर्फे आयोजन




विश्व जागृती मिशन आणि रामाश्रयी राम प्रिया जनकल्याण ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, सुश्री रामप्रियाश्रीजी (माई) यांच्या प्रेरणेने साईनगर येथील मयूरेश भवन येथे आयोजित दहा दिवसीय निवासी मुलींच्या संस्कार शिबिराचा समारोप उत्साहात पार पडला. या समारोप कार्यक्रमाला दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या साध्वी प्रश्मा भारतीजी, सनातन संस्थेचे पूज्य अशोक पात्रीकर काका, ज्येष्ठ समाजसेवक सुदर्शन गांग, श्रीरामकथा प्रवक्ता देवी मंगलाश्रीजी, उपमहापौर सचिन भेंडे, आधार फाऊंडेशनच्या ज्योतीताई राठोड, मनोहर देशपांडे, सीताराम खंडेलवाल तसेच युवा कीर्तनकार ह.भ.प. ज्योतीताई धनाडे आणि दादारावजी अढाऊ व बबिताताई अढाऊ यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी मुलींना संस्कार, आत्मविश्वास, धर्माचरण, स्वसंरक्षण आणि राष्ट्रभक्तीचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिबिराच्या दहा दिवसांच्या कालावधीत मुलींसाठी विविध व्यक्तिमत्त्व विकास आणि संस्कारवर्धक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अतुल अमृतकर यांनी संगीताचे प्रशिक्षण दिले, तर भारती देशमुख यांनी संस्कृत प्रशिक्षण घेतले. अर्चना मावळे यांनी स्वसंरक्षणाचे धडे दिले. निलेश टवलारे यांनी मार्गदर्शन, मंच संचालन आणि धर्माचरणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. तसेच, अनुभूतीताई टवलारे यांनी ‘लव्ह जिहाद आणि त्यावरील उपाय’ या विषयावर मुलींना मार्गदर्शन केले. शिबिरार्थी मुलींनी दहा दिवसांत शिकलेल्या लाठी-काठी, नानचकू, कराटे, योगासने, सूर्यनमस्कार, संस्कृत नाटिका आणि नृत्य यांची प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमातून मुलींमधील आत्मविश्वास, शिस्त, संस्कार आणि कौशल्यांचे दर्शन घडले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मयूरेश भवन उपलब्ध करून देणारे दादाराव अढाऊ व बबिताताई अढाऊ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या सर्व प्रशिक्षक, स्वयंसेवक आणि आयोजकांचे आभार व्यक्त करण्यात आले. पालकांनी मुलींना आवश्यक संस्कार दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. प्रशिक्षणार्थी ६० मुलींना आयोजकांच्यावतीने प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *