Headlines

प्रति पंढरपूरमध्ये महास्वच्छता अभियान; हजारो किलो कचरा संकलित:दोन ट्रॅक्टर चपलांसह १००० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग




आषाढी एकादशीनिमित्त येथील ‘प्रति पंढरपूर’ येथे राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो भाविकांच्या दर्शनानंतर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत तब्बल एक हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत अवघ्या तीन तासांत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. एकादशीच्या दिवशी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक अन्नदात्यांनी रस्त्याच्या दुतर्फा स्टॉल लावून अन्नदान केले होते. मात्र, यामुळे मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, ओला आणि सुका कचरा निर्माण झाला. स्थानिक ग्रामपंचायतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वच्छता करणे शक्य नसल्याने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष मोहिमेचे नियोजन करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी यासाठी १७ मुख्य ‘स्पॉट’ निश्चित केले होते. यामध्ये मंदिर परिसर, पंढरपूर, रांजणगाव शेणपुंजी, तिसगाव, पाटोदा आणि वळदगाव या ग्रामपंचायतींच्या हद्दीचा समावेश होता. प्रत्येक स्पॉटवर विभागप्रमुख आणि गटविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. या स्वच्छता सेवा अभियानात शिक्षक, आरोग्य सेवक, अंगणवाडी आणि आशा सेविका, तसेच ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली घाण, प्लास्टिक आणि अन्नपदार्थांचा कचरा गोळा करण्यात आला. विशेष म्हणजे, या मोहिमेत तब्बल दोन ट्रॅक्टर भरून चपला संकलित करण्यात आल्या. अनेक सहभागी कर्मचाऱ्यांनी या सेवेतच खरा पांडुरंग अनुभवल्याची भावना व्यक्त केली. काल गर्दीमुळे विठ्ठलाचे दर्शन घेता आले नसले तरी, आज प्रत्यक्ष येथे येऊन स्वच्छता केल्याने समाधान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जमा झालेला कचरा संकलित करण्यासाठी पंढरपूर ग्रामपंचायतीसह वाळूज आणि वळदगाव ग्रामपंचायतींनी ट्रॅक्टर व घंटागाड्यांची व्यवस्था केली होती. सलग तीन तास चाललेल्या या मोहिमेतून जमा झालेला सर्व कचरा पुढील प्रक्रियेसाठी महानगरपालिकेकडे सोपविण्यात आला. या अभियानात पंढरपूरच्या सरपंच वैशाली राऊत, उपसरपंच रेश्मा शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश पाटील, पशुसंवर्धन उपायुक्त नानासाहेब कदम, गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे, शिवाजी साळुंके, ज्ञानदेव जायभाये तसेच ग्रामविकास अधिकारी हरीश आंधळे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *