Headlines

सोनईत एसटीच्या फलाटावर चक्क अवैध वाहनांचा वावर:ग्रामस्थ अन् विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप, नगरपर्यंत शटल बससेवेची मागणी‎




सोनई, शिंगणापूर, घोडेगाव ते अहिल्यानगर या मार्गावरील बंद पडलेली राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा त्वरित सुरू करावी, अशी मागणी सोनई व परिसरातील ग्रामस्थांनी नेवासा आगार व्यवस्थापकांकडे केली. मात्र, चालक, वाहक आणि गाड्यांच्या तुटवड्याचे रडगाणे पुढे करत महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी या मार्गावर बस सुरू करण्यास तूर्तास नकार दिला आहे. तर बसस्थानकातील फलाटावर अवैध खासगी वाहने प्रवासी भरताना दिसत आहेत. सेवानिवृत्त सहायक फौजदार शरद लिपाने व परिसरातील त्रस्त प्रवाशांनी नेवासा आगार प्रशासनाला दिलेल्या पत्रात एस.टी.च्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. सोनई हे परिसरातील सुमारे १५ हजार लोकसंख्येचे प्रमुख केंद्र असून आजूबाजूची अनेक लहान-मोठी गावे या केंद्राशी जोडलेली आहेत. या भागात मोठी बाजारपेठ, नामांकित दवाखाने, पब्लिक स्कूल, मिलिटरी स्कूल आणि साखर कारखाना कार्यरत आहे. त्यातच जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री शनिशिंगणापूर जवळच असल्याने या मार्गावर विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार आणि भाविकांची २४ तास मोठी वर्दळ असते. पूर्वी या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावर नियमित बस सुरू होती, मात्र ती अचानक बंद करण्यात आली. महामंडळाच्या या अघोषित बंदीमुळे प्रवाशांची कोंडी झाली असून, याचाच गैरफायदा घेत खाजगी वाहनचालक प्रवाशांकडून अवाजवी भाडे वसूल करत आहेत. क्षमतेपेक्षा दुप्पट-तिप्पट प्रवासी कोंबून अत्यंत धोकादायक पद्धतीने ही वाहतूक सुरू असल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. ही लूटमार थांबवण्यासाठी सोनई बसस्थानकावरून सकाळी ७ वाजता सुटणारी आणि अहिल्यानगर येथून सायंकाळी ७ वाजता परतणारी बस सेवा सुरू करणे गरजेचे आहे. यामुळे महामंडळाच्या हक्काच्या उत्पन्नात मोठी भर पडणार असतानाही, प्रशासन ढिम्म हलण्यास तयार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *