Headlines

चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला:सर्व्हर हॅक; डेटा केला लॉक, अनलॉक करण्यासाठी बिटकॉइनमध्ये मागितली खंडणी




चंद्रपूर जिल्ह्यातील वैद्यकीय आणि प्रशासकीय वर्तुळाला हादरवून सोडणारी एक धक्कादायक सायबर गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. येथील नामांकित ‘चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन’च्या मुख्य सर्व्हरवर अज्ञात हॅकर्सनी मोठा सायबर हल्ला केला आहे. रुग्णालयाचा अत्यंत महत्त्वाचा आणि गोपनीय डिजिटल डेटा लॉक करून, तो पुन्हा मिळवून देण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी चक्क १.२३४५६ बिटकॉइनची खंडणी मागितली आहे. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात अज्ञात हॅकर्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ जून २०२६ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयाच्या माहिती-तंत्रज्ञान (IT) विभागाला मुख्य सर्व्हरच्या कामकाजात अचानक तांत्रिक अडचणी येत असल्याचे जाणवले. आयटी तज्ज्ञांनी जेव्हा यंत्रणेची सखोल तपासणी केली, तेव्हा मुख्य स्क्रीनवर हॅकर्सचा धमकीवजा संदेश झळकत असल्याचे दिसून आले. अज्ञात सायबर गुन्हेगारांनी सर्व्हरमध्ये अनधिकृत घुसखोरी करून संपूर्ण डिजिटल प्रणालीवर आपले नियंत्रण मिळवल्याचे व ते लॉक केल्याचे यावेळी स्पष्ट झाले. वैद्यकीय सेवा विस्कळीत, हॅकर्सकडून खंडणीची मागणी या सायबर हल्ल्यामुळे रुग्णालयाची ‘हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम’ (HIMS) पूर्णपणे कोलमडली आहे. या सिस्टीमच्या माध्यमातूनच रुग्णांचे वैद्यकीय अहवाल, केस पेपर्स, उपचारांचा इतिहास आणि रुग्णालयाचे दैनंदिन व्यवस्थापन चालवले जाते. ही यंत्रणा ठप्प झाल्याने रुग्ण सेवेवर आणि प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. हॅकर्सनी पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, रुग्णालयाचा सर्व डेटा सुरक्षितपणे लॉक आणि कॉम्प्रेस करण्यात आला आहे. हा डेटा पुन्हा हवा असल्यास दिलेल्या डिजिटल पत्त्यावर १.२३४५६ बिटकॉइन जमा करावेत, तरच डेटा अनलॉक करण्याची ‘की’ (Key) दिली जाईल. विशेष म्हणजे, पैसे मिळाल्यास हा डेटा इतर कोणालाही विकणार नाही, असेही हॅकर्सनी म्हटले आहे. रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल; तपास सुरू या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच रुग्णालयाचे संचालक डॉ. राकेश कपुरिया यांच्या सूचनेनुसार आयटी विभागाने सायबर पोलिसांमधे धाव घेतली. याप्रकरणी सतीश महेशकुमार थरवानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ४ जून रोजी रामनगर पोलिस ठाण्यात अज्ञात हॅकर्सविरुद्ध माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रभावती त्र्यंबक एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे विशेष पथक या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आहे. डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, हॅकर्सचा माग काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *