Headlines

हिंगोलीत अन्न व औषध प्रशासनाला कारवाईसाठी लय सापडेना:56 हजारांचा गुटखा पकडून पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न, कार्यालयाच्या कारवाईने अनेकांच्या भुवया उंचावल्या




हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून बेफामपणे गुटखा विक्री होत असतांना अन्न औषध प्रशासनाकडून मात्र झोपेचे सोंग घेतले जात होते. हिंगोली येऊन भेटीची औपचारीकता दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईची लय सापडलीच नाही. त्यानंतर आता सचिव तुकाराम मुंढे यांच्या धास्तीने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वसमत येथे छापा टाकून ५६ हजाराचा गुटखा पकडत स्वतःची पाठ थोपवून घेण्याचा प्रयत्न केला ओह. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे आश्‍चर्य व्यक्त होऊ लागले आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षात बेफामपणे गुटख्याची विक्री होत आहे. या शिवाय खाद्यपदार्थामध्ये भेसळ करून त्याची सर्रास विक्री होत आहे. मात्र याकडे अन्न व औषध प्रशासाच्या अधिकाऱ्यांनी सोईस्करपणे दुर्लक्ष केले. दर महिन्याच्या ता. १ ते ता. ७ तारखे पर्यंतयेऊन जाणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या या कालावधीतील दौऱ्याचे गुपीत अद्यापही सर्वसामान्य नागरीकांनाच कळलेच नाही. दरम्यान, पालमकंत्री नरहरी झिरवाळ अन्न औषध विभागाचे मंत्री असतांही त्यांनी परभणी येथील कार्यालय हिंगोलीत आणण्यासाठी तसूभरही प्रयत्न केला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचेही चांगलेच फावत होते. हिंगोली जिल्हा निर्मिताला तब्बल २७ वर्षाचा कालावधी झाला तरी अद्यापही हे कार्यालय परभणीतच असून त्या ठिकाणावरून हिंगोलीचा कारभार पहिला जातो. विशेष म्हणजे नागरीकांनाही तक्रारी करण्यासाठी कार्यालय कुठे आहे, अधिकारी कोण आहेत याची माहितीही नाही तर अधिकारी देखील सर्व सामान्यांचे भ्रमणध्वनी घेत नसल्याने तक्रारी करणे कठीण झाले होेते. दरम्यान, आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिवपदावर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रशासनाचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. आपल्यावर कारवाई होईल या भितीने आता या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची पावले हिंगोलीकडे कारवाई करण्यासाठी वळू लागली आहेत. एरव्ही पोलिस विभागाच्या भरोश्‍यावर असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या हिंगोली जिल्ह्यात चकरा वाढू लागल्या आहेत. वसमत येथील एका किराणा दुकानावर छापा टाकून ५७ हजार रुपयांचा गुटखा अधिकाऱ्यांनी जप्त केला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घोपे यांच्या तक्रारीवरून मोहम्मद खुर्शीद याच्यावर शनिवारी ता. ६ वसमत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र या कारवाईतून अधिकाऱ्यांनी स्वतःची पाठथोपटून घेतल्याचा आरोप नागरीकांतून केला जात आहे. गुटखा विक्रीतील बडे मासे अद्यापही अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईपासून दुर असल्याचे बोलले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *