![]()
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा उमेदवारीचा विषय चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठवले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, शेवटच्या क्षणी चित्र बदलले आणि उमेदवारी राजेंद्र जैन यांच्या गळ्यात पडली. या घडामोडीमागे केवळ उमेदवारीचा प्रश्न नसून, भुजबळांनी घातलेली एक राजकीय अट आणि महायुतीतील सत्तासमीकरणे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नेमके काय घडले? सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यसभा उमेदवारीसाठी छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून त्यांना दिल्लीत पाठवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र, भुजबळ यांनी पक्ष नेतृत्वासमोर एक महत्त्वाची अट ठेवल्याचे सांगितले जात आहे. ही अट होती त्यांच्या पुतण्याला, माजी खासदार समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्याची. भुजबळ कुटुंबाचे राजकीय पुनर्वसन एकाच वेळी व्हावे, अशी त्यांची भूमिका असल्याचे वृत्त आहे. भाजपने अट फेटाळल्याचा दावा महायुतीतील अंतिम चर्चेदरम्यान समीर भुजबळ यांना मंत्रिपद देण्याच्या मागणीला भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असे वृत्त समोर आले आहे. महायुतीमध्ये आधीच मंत्रिपदांसाठी मोठी स्पर्धा आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांतील अनेक नेते मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत समीर भुजबळ यांना थेट मंत्रिमंडळात घेण्यास भाजप नेतृत्व तयार नव्हते, असे सांगितले जात आहे. भुजबळांनी राज्यसभा ऑफर नाकारली? राजकीय वर्तुळात चर्चेनुसार, समीर भुजबळ यांच्या पुनर्वसनाबाबत स्पष्ट आश्वासन न मिळाल्याने छगन भुजबळ राज्यसभा उमेदवारीबाबत उत्सुक राहिले नाहीत. परिणामी, पक्षाने पर्यायी नावाचा विचार सुरू केला. याच टप्प्यावर उद्योगपती आणि राष्ट्रवादीशी जवळीक असलेले राजेंद्र जैन यांचे नाव पुढे आले आणि अखेरीस त्यांची उमेदवारी निश्चित झाली. राजेंद्र जैन यांची अचानक एंट्री कशी झाली? राजेंद्र जैन यांचे नाव सुरुवातीच्या चर्चेत फारसे नव्हते. मात्र, भुजबळांचे नाव मागे पडताच पक्ष नेतृत्वाने तुलनेने वादमुक्त आणि सर्वमान्य चेहरा शोधण्याचा प्रयत्न केला. महायुतीतील सर्व घटक पक्षांना मान्य होईल असा पर्याय म्हणून जैन यांची निवड झाल्याचे मानले जाते. त्यामुळे राज्यसभेची जागा मिळवण्यात त्यांनी बाजी मारली. भुजबळांच्या नाराजीचा OBC राजकारणावर परिणाम? छगन भुजबळ हे राज्यातील प्रमुख OBC नेत्यांपैकी एक मानले जातात. अलीकडेच OBC आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अशा वेळी त्यांना राज्यसभेत पाठवले जाईल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांमध्ये होती. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने OBC समाजात चुकीचा संदेश जाऊ नये, याची काळजी महायुतीला घ्यावी लागणार आहे. विशेषतः 12 जूनच्या OBC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक संवेदनशील ठरू शकतो. सुनेत्रा पवारांसमोरही नवे आव्हान? या संपूर्ण प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्यासमोरही राजकीय आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची नाराजी टाळायची, तर दुसरीकडे महायुतीतील समतोल राखायचा, अशी दुहेरी कसरत त्यांना करावी लागत आहे. भुजबळांसारख्या ज्येष्ठ, अनुभवी नेत्याला राज्यसभा न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण घडामोडीकडे फक्त राज्यसभा उमेदवारी म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. प्रत्यक्षात हा संघर्ष छगन भुजबळ यांच्या राजकीय पुनर्वसनाचा आणि भुजबळ कुटुंबाच्या सत्तेतील वाट्याचा होता. भुजबळांना दिल्लीत पाठवणे आणि त्याचवेळी समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देणे, हा फॉर्म्युला यशस्वी झाला असता तर भुजबळ कुटुंबाची ताकद पुन्हा वाढली असती. मात्र, ही अट मान्य न झाल्याने संपूर्ण समीकरणच बदलले आणि राज्यसभेची जागा राजेंद्र जैन यांच्याकडे गेली. दरम्यान, राज्यसभेच्या एका जागेवरून सुरू झालेली ही चर्चा आता महायुतीतील सत्तावाटप, OBC नेतृत्व आणि अजित पवार गटाच्या भविष्यातील राजकीय रणनीतीशी जोडली गेली आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात समीर भुजबळ यांना स्थान मिळते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित बातमी वाचा राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांची घोषणा:छगन भुजबळांऐवजी विदर्भाला दिली संधी; सुनील तटकरेंनी दिली माहिती बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून विधानसभेचे सदस्यत्व स्वीकारताच सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या या जागेवर राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. संपूर्ण बातमी वाचा
Source link
राज्यसभेची जागा हातची गेली, मंत्रिपदही अधांतरी:छगन भुजबळांच्या ‘एका अटी’मुळे महायुतीतील समीकरणे कशी बदलली? पडद्यामागील राजकारण!