Headlines

1500 आसन क्षमतेचा अत्याधुनिक डिजिटल कीर्तन हॉल अंतिम टप्प्यात:संत एकनाथ महाराज मंदिर परिसर हायटेक होणार‎




संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठणनगरीतील नाथ मंदिर परिसराचा आता पूर्णपणे कायापालट होत आहे. भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने येथे महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. सध्या अधिक मास निमित्ताने मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असून राज्य शासनाकडून मंदिर परिसराच्या विकासासाठी आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून युद्धपातळीवर सुरू असलेल्या कामांमुळे लवकरच मंदिर परिसराचे रूप पालटणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र बोरकर यांनी सांगितले. संत एकनाथ महाराज समाधी मंदिरासमोर उभारण्यात येत असलेला भव्य डिजिटल कीर्तन हॉल आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. खासदार संदिपान भुमरे यांच्या संकल्पनेतून आणि आमदार विलास भुमरे यांच्या प्रयत्नांतून साकार होत असलेल्या या प्रकल्पामुळे पैठणच्या धार्मिक वैभवात मोठी भर पडणार आहे. गोदावरी नदीकाठावर उभारल्या जाणाऱ्या या तीनमजली वास्तूमध्ये एका वेळी १५०० भाविक बसू शकतील. यामध्ये गोलाकार गॅलरी, वातानुकूलन व्यवस्था आणि डिजिटल एलईडी प्रोजेक्शन यांसारख्या सुविधा असतील. बेंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ध्यानसाधना केंद्राच्या धर्तीवर या हॉलची रचना करण्यात आली असून याचा व्यास १०० फूट आणि उंची ८० फूट आहे. हा हॉल कीर्तन, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच नवोदित कीर्तनकारांच्या प्रशिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सध्या नाथ समाधी मंदिर परिसराशी जोडणाऱ्या काही रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे दरवर्षी नाथषष्ठी उत्सवाच्या काळात मानाच्या दिंड्यांसह येणाऱ्या हजारो वारकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, नव्याने मंजूर झालेल्या निधीमुळे रस्त्यांंची कामे होणार असून या समस्या दूर होणार आहेत. नगराध्यक्ष विद्याभूषण कावसनकर यांनी नाथ समाधी मंदिर ते नाथवाडा परिसरातील विकासकामांवर लक्ष केंद्रित केले आहे. मंदिर परिसरातील रस्ते, मूलभूत सुविधा व अन्य विकासकामे वेगाने मार्गी लावली जात असल्याने आतापासूनच भाविकांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली जात आहे. मुख्य मार्गावर उभारली जाणार देखणी शिल्पे भाविकांना आध्यात्मिक अनुभूतीसोबतच सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवण्यासाठी मंदिर परिसर आणि मुख्य मार्गावर संत एकनाथ महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य शिल्पे उभारण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र बोरकर यांनी सांगितले की, वारकरी व भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुशोभीकरण करून धार्मिकतेच्या अनुषंगाने सर्व कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. पैठण नगरीचे भव्य रूप संपूर्ण राज्याला पाहायला मिळेल Ãपैठण हे ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ असून संत एकनाथ महाराजांची ही कर्मभूमी-जन्मभूमी आहे. त्यामुळे येथील विकासकामांसाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. येणाऱ्या काळात पैठण नगरीचे भव्य दिव्य रूप संपूर्ण राज्याला पाहायला मिळेल. -विलास भुमरे, आमदार, पैठण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *