Headlines

सहकाराचा आखाडा:बँक निवडणुकीत शिवसेनेला झटका; संजना जाधव, सत्तार, मानेंचे अर्ज बाद, पालकमंत्री शिरसाट, खा. काळे यांचे अर्ज वैध



छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला (शिंदे गट) मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून सूत्रे सांभाळणारे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर अब्दुल सत्तार, कन्नडच्या आमदार संजना जाधव आणि माजी आमदार अण्णासाहेब

.

छत्रपती संभाजीनगरात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) अजूनही जागावाटपाची अधिकृत महायुती झालेली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीनेही कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे निवडणुकीच्या लढतीचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी निवडणुकीपूर्वीच शिवसेनेचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.

४५ जणांचे अर्ज बाद

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २० जागांच्या संचालकपदासाठी १५८ उमेदवारांनी एकूण २१४ अर्ज दाखल केले होते. छाननीमध्ये त्यापैकी ४५ जणांचे अर्ज बाद झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने आमदार संजना जाधव, समीर अब्दुल सत्तार, शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा संजय जाधव आणि ‘उबाठा’ गटाच्या इंदुमती साहेबराव पाटील यांचा समावेश आहे. दुसरीकडे, विरोधकांनी आक्षेप घेतलेले खासदार कल्याण काळे, पालकमंत्री संजय शिरसाट, हर्षदा शिरसाट आणि राजू शिंदे यांचे अर्ज वैध ठरले आहेत. भाजपच्या अनुराधा चव्हाण यांचा प्राथमिक कृषी पतपुरवठा गटातील अर्ज अवैध ठरला असला, तरी महिला प्रतिनिधी गटातून त्यांचा अर्ज वैध ठरला आहे.

अर्ज अवैध ठरलेले अन्य उमेदवार

विठ्ठलराव चोपडे (फुलंब्री), जयप्रकाश चव्हाण (सोयगाव), पवार प्रीती, मनोज देशमुख, अब्दुल जावेद अब्दुल वाहेद, मीनाबाई निकम, आशा अकोलकर, चंद्रकला घुले, मनोज राठोड (कन्नड), गाडेकर रूपचंद, मंदा पवार, दीपक जाधव (गंगापूर), मंदा सोनवणे, पटेल परवीन नबी, शोभा निकम, पूनम मगर, छायाबाई थोट (वैजापूर), आश्विनी मडके (पैठण), रावसाहेब गाजरे, प्रणिकेत पाटील, रितेश मुनोत, मंदाबाई राठोड, शीतल निकम, मधुकर हांडे, विशाल नांदरकर, प्रदीप शिंदे (छत्रपती संभाजीनगर), काकासाहेब फरकाडे (सिल्लोड), रत्नप्रभा बोरसे (फुलंब्री), स्वरूपचंद कुकलारे (लासूर स्टेशन)

न्यायालयात दाद मागणार

गेल्या तीन महिन्यांपूर्वीच माझ्या इमारतीमधून बँकेच्या शाखेचे ऑफिस रिकामे करण्याबाबत नोटीस दिली आहे. मात्र त्यांनी ते रिकामे केले नाही. हा सर्व प्रकार हेतुपुरस्सर केला आहे. या अन्यायाविरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत. – समीर सत्तार, उमेदवार

जिल्हा बँक निवडणुकीत नेत्यांचे उमेदवारी अर्ज या कारणांमुळे अर्ज ठरले अवैध

समीर सत्तार (शिवसेना) : समीर सत्तार यांच्या मालकीच्या सोयगाव येथील गट नंबर २८८ मधील इमारतीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा भाड्याने देण्यात आली आहे. ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ (लाभाचे पद) नियमानुसार हा व्यावसायिक व्यवहार ठरत असल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.

संजना हर्षवर्धन जाधव (शिवसेना) : संजना जाधव ज्या संस्थेचे प्रतिनिधित्व करत होत्या, त्या संस्थेचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. ‘२ वर्षे सभासदत्व’ असण्याची अट पूर्ण न केल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. अण्णासाहेब माने (शिवसेना) : संबंधित संस्थेचा लेखापरीक्षण अहवाल ‘क’ दर्जाचा असल्यामुळे अर्ज अवैध ठरवण्यात आला.

अर्चना नितीन पाटील (रा.काँ. : अजित पवार गट) : लेखापरीक्षण वर्गवारीबाबतचा अहवाल सादर न केल्यामुळे अर्ज अपात्र ठरला.

सुवर्णा संजय जाधव : लेखापरीक्षण अहवालात वर्गवारी नमूद नसल्याने अर्ज बाद.

इंदुमती साहेबराव पाटील (शिवसेना-उबाठा) : संस्थेचा २०२४-२५ वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल ‘क’ वर्गात आहे. नियमानुसार हा अहवाल ‘अ’ किंवा ‘ब’ वर्गात असणे बंधनकारक आहे.

दाद मागण्यासाठी ३ दिवस मुदत

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी उमेदवारांकडे ३ दिवसांचा कालावधी आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १५२ नुसार विभागीय सहनिबंधकांकडे तीन दिवसांत अपील करता येते. तेथेही अपील फेटाळले गेल्यास उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

अब्दुल सत्तारांविना जिल्हा मध्यवर्ती बँक

जिल्हा बँकेत आमदार अब्दुल सत्तार सलग १० वर्षे संचालक होते. नव्या नियमानुसार, १० वर्षे संचालक राहिलेल्यांना निवडणूक लढवता येत नसल्याने सत्तार प्रक्रियेतून बाद झाले होते. बँकेचा अध्यक्ष ठरवण्यापासून सर्वच निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असे. या वेळी त्यांनी आपले पुत्र समीर सत्तार यांना रिंगणात उतरवले. मात्र त्यांचा अर्ज बाद झाला. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही समीर सत्तार यांना माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे ऐनवेळी राजकीय गणिते फिरवणाऱ्या सत्तार यांना या निवडणुकीपासून दूर ठेवण्यात विरोधक यशस्वी झाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *