![]()
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक व पद्मभूषण डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते कॅम्प परिसरातील द बिशप स्कूलच्या नवीन शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. पूनावाला यांनी सांगितले की, बिशप स्कूलने त्यांना केवळ शिक्षण दिले नाही, तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा भक्कम पाया घातला. शाळेच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारची मदत करण्यास आपण कायम तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या उद्घाटन समारंभाला शाळेचे प्राचार्य व मानद सचिव शेन मॅकफर्सन, बिशप एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रुडोल्फ वूडमन, डॉ. पूनावाला यांचे नातू डेरीयस पूनावाला, मुख्याध्यापिका मयुरा बारसे तसेच शाळेचे पदाधिकारी, शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या शैक्षणिक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने ही नवीन इमारत उभारण्यात आली आहे. प्रतिष्ठित माजी विद्यार्थी डॉ. सायरस एस. पूनावाला आणि अदार सी. पूनावाला यांच्या सहकार्याने हे बांधकाम साकारण्यात आले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे संस्थेच्या विकासाला महत्त्वपूर्ण गती मिळाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमात डॉ. सायरस एस. पूनावाला आणि अदार सी. पूनावाला यांचा नवीन इमारतीच्या उभारणीत दिलेल्या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. बिशप एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रुडोल्फ वूडमन आणि प्रशासकीय मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते त्यांना रौप्य फलक प्रदान करून गौरविण्यात आले. डॉ. पूनावाला म्हणाले, “जेव्हा जेव्हा मी या शाळेत येतो, तेव्हा जुन्या आठवणींमध्ये हरवून जातो. 1949 ते 1958 या कालावधीत मी येथे शिक्षण घेतले. त्या काळातील अनेक प्रसंग आजही माझ्या स्मरणात आहेत. एकेकाळी या शाळेत खोडकर विद्यार्थी म्हणून वावरणारा मी, आज प्रमुख पाहुणा म्हणून याच शाळेत उपस्थित आहे, यावर माझाच विश्वास बसत नाही.” शाळेने उभारलेली ही नवी वास्तू केवळ इमारत नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा पाया आहे, असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य शेन मॅकफर्सन यांनी यावेळी बोलताना सांगितले की, 160 वर्षांहून अधिकचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या द बिशप स्कूलची परंपरा डॉ. सायरस पूनावाला यांच्यासारख्या माजी विद्यार्थ्यांमुळे अधिक समृद्ध झाली आहे. त्यांच्या उदार सहकार्यामुळे शाळेला अत्याधुनिक सुविधा असलेली नवी इमारत उभारणे शक्य झाले असून, त्याचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा लाभ होणार आहे.
Source link
डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते बिशप स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन:'शाळेने माझ्या आयुष्याचा भक्कम पाया घातला', पूनावाला यांचे प्रतिपादन