Headlines

आयुक्त कार्यालयावर ठिय्या:शेतकऱ्यांना नाही, मग कोणालाच नाही; लोकप्रतिनिधींचे वेतन, भत्ते, खर्च रोखा, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तुपकर यांचा एल्गार‎


.

लोकप्रतिनिधींचे वेतन, भत्ते आणि प्रकल्पांवरील खर्च रोखा. शेतकऱ्यांना मदत पुरवा, अशी आग्रही मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केली आहे. याच मागणीसाठी आज, मंगळवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न अवस्थेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यांच्या मते आंदोलनाचे हे लोण लवकरच राज्यभर पसरणार आहे. त्यासाठी सर्वदूर त्यांची भ्रमंती सुरू आहे. या भ्रमंतीअंती राज्यात पंजाबमधील शेतकऱ्यांसारखे आंदोलन उभे केले जाणार आहे.

पावसाळ्याच्या गेल्या तीन महिन्यांत अमरावतीसह राज्यभरात पुरेसा पाऊस पडला नाही. परिणामी सर्वत्र अवर्षणाची स्थिती आहे. पिके पिवळी पडली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात तत्काळ कोरडा दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना पुरेशी मदत पुरवा, कर्जमाफीत तांत्रिक कारणांचा बाऊ न करता सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, नियमित कर्ज फेडणाऱ्यांना २ लाख रुपयांची सानुग्रह मदत पुरवा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी मुख्य रस्त्यावर ठिय्या दिल्याने काही काळ वाहतूक ‘एकदिशा मार्ग’ अशी करण्यात आली होती. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे, मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरके, विदर्भ प्रमुख किरण ठाकरे, विदर्भ संपर्कप्रमुख अमित अढाऊ, युवा अध्यक्ष लक्ष्मण मोरे यांच्यासह पाचही जिल्ह्यांतून आलेले पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘जेन-झी’ जर पेटला तर… दिल्लीच्या जंतर-मंतरवर अलिकडेच झालेल्या आंदोलनाचे उदाहरण पुढे करीत जेन झी जर पेटला तर काय होऊ शकते, याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली. त्यांच्या मते क्रांतिकारी शेतकरी संघटनेतही तरुणांचाच सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भविष्यात आम्ही काय करू शकतो, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही, असे म्हणून त्यांनी राज्यकर्त्यांना भानावर येण्याचे संकेत दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *