![]()
जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर स्फोटाचा चौकशी अहवाल जाहीर करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, वाघिणीच्या हल्ल्यांची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आदी मागण्यांसाठी काँग्रेसने मंगळवारी जिल्हाकचेरीवर धडक दिली. निदर्शने व घोषणाबाजी केल्यानंतर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठवले. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतून ५० टक्केच कर्जमाफी दिली जात असल्याचा आरोपही या वेळी केला. माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर,डॉ. सुनील देशमुख, जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. डफरीनमधिल अग्निकांडानंतर संबंधित व्हेंटिलेटर कंपनीच्या उपकरणांची राज्यभर सुरक्षा तपासणी करावी, दोष आढळल्यास त्या कंपनीचा पुरवठा बंद करावा, जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, पीक विम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणीही यावेळी केली. गेल्या दोन दिवसांत वाघिणीच्या हल्ल्यांवरून वन विभागाला धारेवर धरत वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला. जिल्ह्यात खून, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार यासारख्या घटना घडत असल्याचा आरोप करीत काँग्रेसने वाढत्या गुन्हेगारीवरही सरकारला लक्ष्य केले. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक निर्माण करून कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी या वेळी केली. गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्यास नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणीही या वेळी निवेदनातून करण्यात आली . या आंदोलनात शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, प्रवक्ते मिलिंद चिमोटे, हरिभाऊ मोहोड, जयंत देशमुख, रामेश्वर अभ्यंकर, प्रदीप देशमुख, डॉ. रवींद्र वाघमारे, मुकद्दर पठाण, शैलेश गवई, पंकज देशमुख, गजानन देशमुख, कांचनमाला गावंडे, जयश्री वानखडे, श्रीकांत बोंडे, समाधान दहातोंडे, गिरधर राठोड, दीपक पडळकर, सेतू देशमुख, प्रणव गौरखेडे, राहुल येवले, वैभव देशमुख, विपुल भडांगे, भूषण कोकाटे, यशवंत मंगरोळे, वैभव वानखडे, राहुल गवई, प्रवीण मनोहर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. म्हणून दडपला जातोय डफरीनचा अहवाल डफरीनमधील स्फोटाच्या घटनेनंतर चौकशी समितीचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे आश्वासन सरकारतर्फे दिले होते. मात्र, १५ दिवस उलटूनही अहवाल जाहीर झालेला नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कदाचित दोषींना वाचवण्यासाठी हा अहवाल दडपला जात आहे का, असा सवालही दबक्या आवाजात उपस्थित केला जात आहे.
Source link
काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक:पीक पंचनामे, डफरीनचा अहवाल, वाघिणीच्या हल्ल्यांची चौकशी; गुन्हेगारीवर कारवाईची मागणी