![]()
श्रीकृष्ण सत्य युगातील महाराजकुमार होते. सत्ययुगात आपण सर्वजण सर्वगुणसंपन्न, मर्यादा पुरुषोत्तम देवी-देवता होतो. आज परमपिता परमात्मा शिव निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूपात या सृष्टीवर दिव्य अवतरण करून ज्ञानमुरलीद्वारे मानवाला मार्गदर्शन करीत आहेत. या ज्ञानामुळे बुद्धी, दिव्य गुण, दिव्य शक्ती आणि श्रेष्ठ संस्कारांचा आंतरिक शृंगार होत आहे. त्यामुळे जीवन चारित्र्यसंपन्न बनते. आंतरिक शृंगार अविनाशी, तर बाह्य शृंगार विनाशी असतो, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी निशादीदी यांनी केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सेवाकेंद्रावर गोकुळाष्टमी कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करत होत्या. निशादीदी म्हणाल्या, गोकुळाष्टमीला आई मुलाला श्रीकृष्णाप्रमाणे वस्त्रे परिधान करून सजवते. या बाह्य शृंगारामुळे मुलांमध्ये नवचैतन्य, उत्साह निर्माण होतो. मात्र केवळ बाह्य रूप श्रीकृष्णासारखे केल्याने मूल श्रीकृष्णासमान दैवी गुणसंपन्न होत नाही. त्यासाठी मुलाने श्रीकृष्णासारखे दैवी गुण आत्मसात करावेत. यासाठी आईने प्रथम स्वतःच्या आणि मुलाच्या आंतरिक शृंगाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. संगीतादीदी म्हणाल्या, श्रीकृष्ण व गोप-गोपिकांची रासलीला प्रसिद्ध आहे. त्यात सहभागी होण्यासाठी सध्याच्या जीवनात आपण परस्परांमध्ये विचार, स्वभाव व संस्कारांच्या मिलनाची रास करणे आवश्यक आहे. राजयोगाच्या नियमित अभ्यासाने संस्कार मिलनाची ही रास सहजपणे होऊ शकते. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थितांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या गीतावर रासलीलेचा आनंद घेतला. भक्तिमय वातावरणात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली.
Source link
राजयोगाने जीवनाचा आंतरिक शृंगार करा- निशादीदी:नवचैतन्य येण्यासाठी गोकुळाष्टमीला आई आपल्या मुलाला श्रीकृष्णाप्रमाणे सजवते