![]()
ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, पारंपरिक पिकांचे संवर्धन व्हावे तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत मौजा कुटंगा येथे महिला शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात परिसरातील महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शेतीच्या कामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी मेहनत घेणाऱ्या महिलांना पिकांच्या आधुनिक व्यवस्थापनाची माहिती मिळणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामुळे महिला शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडली असून, शेतीकडे अधिक शास्त्रीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने पाहण्याचा नवा दृष्टिकोन त्यांना मिळाला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तालुका कृषी अधिकारी यू. एस. जाधव यांनी महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत तूर व तृणधान्य पिकांच्या लागवडीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. सध्याच्या बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेता शेतकऱ्यांनी पारंपरिक आणि स्थानिक पिकांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सावा, कुटकी आणि कोदो यांसारखी पारंपरिक तृणधान्ये केवळ शेतीपुरती मर्यादित नसून पोषण, अन्नसुरक्षा आणि शाश्वत शेतीच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहेत, यावर त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी मंडळ कृषी अधिकारी सदानशिवे तसेच कृषी सहाय्यक एस. आकोस्कर यांची उपस्थिती होती. त्यांनी महिला शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना, पिकांच्या व्यवस्थापनातील आवश्यक बाबी आणि उपलब्ध कृषी मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. हा प्रशिक्षण उपक्रम म्हणजे केवळ शेतीविषयक माहिती देण्याचा कार्यक्रम नसून, महिला शेतकऱ्यांच्या ज्ञानाला, आत्मविश्वासाला आणि स्वावलंबनाला बळ देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे. पारंपरिक तृणधान्यांचे संवर्धन करत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास भविष्यात शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासोबतच अन्न व पोषण सुरक्षेलाही मोठी मदत होणार आहे. महिला शेतकऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान विविध विषयांवर उत्स्फूर्त सहभाग घेत मार्गदर्शकांशी संवाद साधला. कृषी विभागाच्या अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करण्याची प्रेरणा मिळत असून, ‘ज्ञानातून प्रगती आणि शेतीतून समृद्धी’ या दिशेने कुटंगा परिसरातील महिला शेतकऱ्यांची वाटचाल अधिक बळकट होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Source link
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत महिला शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा:तृणधान्यांच्या लागवडीबाबत मार्गदर्शन; महिलांच्या सक्षमीकरणाला आधार