![]()
पुणे शहरातील कात्रज परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत वेगवेगळ्या सोसायट्यांमधील तीन सदनिकांचे कुलूप तोडले. या घटनांमध्ये सोन्याचे दागिने आणि रोकड असा लाखोंचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. यापैकी एका घटनेत, एका ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला. अलका उत्तम कवितके (वय 65, रा. मनमंदिर बिल्डींग, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कवितके यांची सदनिका 8 जून रोजी मध्यरात्री बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडले. बेडरूममधील कपाट उचकटून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण चार लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याच भागातील दुसऱ्या एका सोसायटीत राहणारे नवनाथ साळुंखे आणि आदर्श सिंह यांच्याही सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज चोरून नेला. साळुंखे आणि सिंह यांच्या सदनिका बंद असल्याने नेमका किती ऐवज चोरीला गेला, याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. 9 जून रोजी कात्रज-कोंढवा रस्त्यावरील तीन सदनिकांचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरातील रहिवासी भयभीत झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू असून, पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी पुढील तपास करत आहेत. एसटी प्रवासी महिलेचे दागिने चोरी एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून मंगळसूत्र, रोकड असा 55 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 41 वर्षीय महिला मूळच्या नागपूरच्या आहेत. त्या श्रीगोंदा ते स्वारगेट या मार्गावरील एसटी बसमधून प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या पिशवीतून मंगळसूत्र, रोकड असा ऐवज चोरुन नेण्यात आल्याची घटना घडली. स्वारगेट एसटी स्थानकात उतरल्यानंतर महिलेने पिशवीची तपासणी केली. तेव्हा दागिने, रोकड चोरीचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलिस निरीक्षक एस शिरसाठ तपास करत आहेत.
Source link
कात्रजमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!:एकाच रात्री 3 फ्लॅट फोडल्याने खळबळ, लाखो रुपयांचा ऐवज लंपास