Headlines

वेरूळचा विकास म्हणजे स्वच्छता व पुनर्वसन:जिल्हाधिकारी विनय गौडा यांची ग्वाही; पिंपरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट




जगप्रसिद्ध वेरूळ येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी विकास म्हणजे केवळ मोठमोठ्या इमारती व लक्झरी घरे नव्हे, तर स्वच्छ परिसर, शुद्ध वातावरण आणि मन प्रसन्न करणारे शहर म्हणजे खरा विकास होय, अशी स्पष्ट भूमिका जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज वेरूळ येथे मांडली. नियोजित दौऱ्यानुसार जिल्हाधिकारी गौडा यांनी वेरूळला भेट देऊन स्थानिक दुकानदारांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी वेरूळ लेणी परिसर व घृष्णेश्वर मंदिर परिसरातील विकास कामांचा आढावा घेतला. आधी पुनर्वसन, मगच विकास बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, वेरूळ लेणी व मंदिर परिसरातील कोणत्याही दुकानदारावर अन्याय होणार नाही. सर्व अतिक्रमणधारक व दुकानदारांचे आधी पुनर्वसन केले जाईल, त्यानंतरच ‘मंगल वेरूळ विकास आराखडा’ राबवण्यात येईल. कोणालाही बेघर न करता सर्वांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. कचरा व्यवस्थापन ग्रामपंचायतीची जबाबदारी वेरूळमधील कचरा व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची असून, परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी ठोस पावले उचलण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. घृष्णेश्वर मंदिर व वेरूळ लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ व सुंदर परिसराचा अनुभव मिळावा, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. विकासाची व्याख्या स्पष्ट केली विकासाची व्याख्या सांगताना जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, “विकास म्हणजे फक्त सिमेंटची जंगले उभी करणे नव्हे. संपूर्ण गाव, स्वच्छ रस्ते, शुद्ध हवा, पाणी व येथे आल्यावर मनाला समाधान वाटेल असा परिसर निर्माण करणे म्हणजेच खरा विकास,” असे गौडा यांनी सांगितले. पैठण विकास प्राधिकरण मंडळासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी दुकानदारांचे प्रश्न समजून घेतले. वेरूळच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना विश्वासात घेऊन योजना राबवली जाईल व कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक दुकानदार व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पिंपरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट; एक लाखांची आर्थिक मदत मंजूर खुलताबाद तालुक्यातील पिंपरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेट देऊन विविध शासकीय योजनांद्वारे मदतीचा हात पुढे केला. आत्महत्या केलेले शेतकरी विष्णू काशिनाथ जोगदंड यांच्या कुटुंबाला तातडीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून, घरकुल योजनेअंतर्गत पक्के घर उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील शेतकरी विष्णू काशिनाथ जोगदंड यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून मागील वर्षी ३१ मे रोजी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी व लहान मुलगा असा परिवार असून, या कुटुंबाकडे स्वतःचे राहते घरही नसल्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बुधवारी दुपारी सुमारे चार वाजता पिंपरी येथे भेट दिली. त्यांनी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच विविध शासकीय योजनांद्वारे तातडीची मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश संबंधित कुटुंबाला प्रदान केला. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनांमधून लाभ देऊन दोन ते तीन दिवसांत पक्क्या घरासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाला पेरणीसाठी बियाण्यांचेही वितरण करण्यात आले. भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरातील एका घराच्या जनगणना नोंदींची क्रॉस व्हेरिफिकेशन प्रक्रिया देखील केली. संबंधित लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा योग्य लाभ मिळत आहे की नाही, याचीही त्यांनी खातरजमा केली. दरम्यान, नियोजित दौऱ्यानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी वेरूळ येथे भेट देऊन अतिक्रमणासंदर्भातील माहिती घेतली. तसेच वेरूळ परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेऊन संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या संवेदनशील आणि तत्पर हस्तक्षेपामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यावेळी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *