![]()
छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात तीन चिमुकल्यांचे प्राण वाचवण्यात आले. गेल्या तीन दिवसांत बदाम, शेंगदाणा आणि चिंचोका गिळलेल्या तीन बालकांवर कान, नाक, घसा (ईएनटी) आणि बालरोग विभागाच्या सतर्कतेमुळे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पहिल्या घटनेत, दोन वर्षांच्या आयान सय्यदने खेळताना बदाम गिळला होता. त्याला खोकला येत होता, श्वास घेण्यास त्रास होत होता आणि आवाजात बदल झाला होता. कुटुंबियांनी त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे-मोरे यांनी तपासणी करून रुग्णाला ईएनटी विभागाकडे पाठवले. ईएनटी विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांनी तातडीने ब्रॉन्कोस्कोपी शस्त्रक्रिया करून बदाम सुरक्षितपणे बाहेर काढला. दुसऱ्या घटनेत, एक वर्षाच्या गायत्री बोराडेने घरात शेंगदाणा गिळला. शेंगदाणा तिच्या फुफ्फुसात अडकल्याने तिला त्रास होऊ लागला. कुटुंबियांनी तिलाही घाटी रुग्णालयात आणले. तिसऱ्या घटनेत, आठ वर्षांच्या सई काकडेने चिंचोका गिळल्याने तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. या तीनही बालकांवर घाटी रुग्णालयात तातडीने आणि मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या यशस्वी उपचारांबद्दल कुटुंबियांनी घाटी प्रशासन आणि डॉक्टरांचे आभार मानले. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुचिता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपचार पार पडले. या टीममध्ये बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे-मोरे, ईएनटी विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांच्यासह डॉ. सोनाली जटाळे, डॉ. ओजस कुलकर्णी, डॉ. उत्कर्ष शहा, डॉ. ओम प्रकाश, डॉ. चेतना, डॉ. वत्सल यांचा समावेश होता. तसेच, ओटी इन्चार्ज अश्विनी झेंडे, राहिला शेख आणि भूलतज्ञ डॉ. विद्या चव्हाण, डॉ. किरण यांनीही यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
Source link
घाटीत तीन चिमुकल्यांना जीवदान:बदाम, शेंगदाणा, चिंचोका गिळलेल्या वस्तू शस्त्रक्रियेने काढल्या