Headlines

लंडनमध्ये विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट:'एवढा मोठा क्रिकेटपटू, पण अत्यंत साधा आणि नम्र', उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक




भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने लंडन दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या लंडन दौऱ्यात तीन मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या एकनाथ शिंदे आणि विराट यांच्यात यावेळी विविध विषयांवर दीर्घकाळ चर्चा झाली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना शिंदे यांनी या भेटीची सविस्तर माहिती दिली असून, यावेळी त्यांनी विराटचे भरभरून कौतुक करत त्यांच्यात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, यावरही प्रकाश टाकला. एकनाथ शिंदे म्हणाले, विराट कोहली लंडनमध्ये राहतो. मी इकडे आल्याचं त्याला कळल्यावर त्याने माझी आवर्जून सदिच्छा भेट घेतली. एवढा मोठा क्रिकेटपटू असूनही तो किती साधा आणि नम्र आहे, हे पाहून मला खूप आनंद झाला. याआधीसुद्धा आम्ही भेटलो होतो पण यावेळी निवांत आणि चांगला संवाद झाला. लंडनमध्ये मिळालेल्या पुरस्कारांबद्दल चर्चा झाली. महाराष्ट्रात झालेला विकास खरोखरच मोठा आणि अभूतपूर्व असल्याचं विराट म्हणाला. ‘थर्ड मुंबई’, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मेट्रो, तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुरू असलेल्या कामांबद्दलही आम्ही चर्चा केली. महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आम्ही आखलेल्या योजनांची आणि सध्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहितीही त्याला दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मला मिळालेला पुरस्कारही याच विकासकामांशी संबंधित होता. त्यामध्ये पायाभूत सुविधा, विकास, ‘लाडकी बहीण’ योजना आणि ‘सरकार आपल्या दारी’ या उपक्रमांचा समावेश होता. या सगळ्या विषयांवर आमची सविस्तर चर्चा झाली आणि हे ऐकून विराटलाही खूप आनंद झाला. त्याला भेटून मलाही खूप आनंद झाला. तसेच आजच्या तरुणांना त्यांच्या कला आणि कौशल्याला योग्य संधी कशी मिळेल, तसेच त्यांनी विविध क्षेत्रांत आणि स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी कशी करावी, याबद्दलही आम्ही बोललो. कारण आजचा युवा वर्ग हाच देशाचे भवितव्य आहे. याबाबत विराटने काही चांगल्या आणि महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशाला नक्कीच फायदा होऊ शकतो. एकनाथ शिंदेंचा लंडनमध्ये सन्मान लंडन दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन अवॉर्ड’, ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड फॉर ट्रान्सफॉर्मेटिव्ह लीडरशिप’ आणि ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड’ या तीन मानाच्या जागतिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. तसेच, ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह असलेल्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये त्यांनी इंग्रजीत केलेले प्रभावी भाषण सध्या संपूर्ण राज्यभरात विशेष चर्चेचा विषय ठरले आहे. विंडीजविरुद्धच्या मालिकेतून विराटचे पुनरागमन दुसरीकडे, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहे. भारत दौऱ्यावर येणाऱ्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध 27 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय (वनडे) मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 27 सप्टेंबर रोजी, दुसरा सामना 30 सप्टेंबर रोजी आणि तिसरा व अंतिम सामना 3 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *