Headlines

मनोज जरांगेंचा मुंबई आंदोलनाचा मार्ग मोकळा:'मुंबईत येण्यापासून रोखू शकत नाही', उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आंदोलनविरोधी याचिका फेटाळली




मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सध्या राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील ठाम असून, अंतरवाली सराटी येथे त्यांचे गेल्या 14 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. यावर अद्याप कोणताही ठोस तोडगा न निघाल्यामुळे, 12 तारखेनंतर थेट मुंबईत धडक मारण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, जरांगे पाटील यांच्या संभाव्य आंदोलनाला आझाद मैदानात परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांची मुंबईत येण्याची वाट मोकळी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला? मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यास मनाई करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. मागील घटनांचा दाखला देऊन यावेळी त्यांना परवानगी नाकारता येणार नाही, तसेच आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याने त्यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील संभाव्य आंदोलनाला विरोध दर्शवणारी याचिका निलेश डहाणूकर आणि राजेश दळवी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेद्वारे जरांगे यांना आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी न देण्याची मागणी करण्यात आली होती. मागील आंदोलनावेळी आंदोलकांनी संपूर्ण दक्षिण मुंबईचा ताबा घेतल्याचे चित्र होते आणि त्यावेळी खुद्द उच्च न्यायालयालाच आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश द्यावे लागले होते, या परिस्थितीचा दाखला याचिकाकर्त्यांनी न्यायालयासमोर दिला. मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती महेश त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सुनावणीअंती, मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे याचिकाकर्त्यांना झटका बसला असून, जरांगे पाटील यांचे पुढील आंदोलन आता मुंबईतच होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *