![]()
पुणे शहरातील गणेशोत्सवासाठी देशभरातून मोठ्या संख्येने नागरिक येतात. या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीजपुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यरत ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. शीतल तेली-उगले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासनासह सर्व विभागांनी चांगली तयारी केली आहे. रेल्वे, बस आणि सार्वजनिक वाहतुकीने मोठ्या संख्येने नागरिक पुण्यात येतात. प्रत्येक रेल्वेगाडीनंतर मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडल्याने वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. यासाठी गर्दीच्या वेळेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रणा उपलब्ध करून द्यावी. गणेशोत्सव काळात विविध गणेश मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही कार्यक्रमांना हजारो नागरिक उपस्थित राहतात. त्यामुळे अशा कार्यक्रमांच्या ठिकाणी वाहतूक आणि गर्दीचे स्वतंत्र नियोजन करणे आवश्यक आहे. वाहतुकीतील बदल, पर्यायी मार्ग, पार्किंग व्यवस्था आणि गर्दीच्या ठिकाणांची माहिती नागरिकांना वेळेत द्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाचा महत्त्वाचा उत्सव आहे. देशभरातून नागरिक तो पाहण्यासाठी येतात. त्यामुळे महिला, बालके आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी मंगळसूत्र चोरी, पाकीटमारी यांसारख्या घटना टाळण्यासाठी पोलिसांची २४ तास गस्त आणि प्रभावी बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मागील वर्षीच्या अनुभवातून आलेल्या अडचणींचा आढावा घेऊन यावर्षी आवश्यक त्या सुधारणा कराव्यात. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना सुरक्षित आणि आनंददायी वातावरण मिळेल असे पाहावे, असेही त्यांनी सांगितले. गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात वीजपुरवठा अखंडित राहील, याकडे संबंधित यंत्रणांनी बारकाईने लक्ष द्यावे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
Source link
गणेशोत्सवात वाहतूक, सुरक्षा, स्वच्छतेची यंत्रणा सक्षम ठेवा:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे तयारीचा आढावा घेऊन निर्देश दिले