![]()
बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी संभाजीनगर महापालिका आणि ‘दिव्य मराठी’च्या संयुक्त विद्यमाने मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. शहानूरमियाँ दर्गाजवळील श्रीहरी पॅव्हेलियन येथे शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत झालेल्या या कार्यशाळेला संभाजीनगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल १००० हून अधिक विद्यार्थी, नागरिक आणि कुटुंबांनी या कार्यशाळेत सहभागी होत स्वतःच्या हातांनी मातीचा बाप्पा साकारला. मनपाच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. महापौर, नगरसेवक, विविध क्षेत्रांतील सनदी अधिकारी, मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिकांनी एकाच छताखाली एकत्र येत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला. शहरातील नामांकित मूर्तिकार, कला महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच १०० हून अधिक प्रशिक्षकांच्या पथकाने सहभागी नागरिकांना मोफत मार्गदर्शन केले. मातीला आकार देत साकारला बाप्पा गणेशमूर्तीचा पाया कसा तयार करायचा, मातीला योग्य आकार कसा द्यायचा, बाप्पाच्या चेहऱ्यावरील भाव कसे रेखाटायचे, सोंड आणि कानांची रचना कशी करायची, याचे थेट प्रात्यक्षिक अनुभवी मूर्तिकार आणि कलावंतांनी सहभागी नागरिकांना करून दाखवले. त्यानंतर लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाने आपल्या कल्पकतेनुसार मातीला आकार देत गणरायाची मूर्ती साकारली. विशेष म्हणजे, या कार्यशाळेत सहभागी होऊन अत्यंत सुंदर गणेशमूर्ती बनविणाऱ्या कलाकारांसाठी आकर्षक बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली. त्यामुळे सहभागींच्या उत्साहाला आणखी उधाण आले होते. ‘पुढच्या वर्षी शहराच्या प्रत्येक भागात कार्यशाळा’ यावेळी महापौर समीर राजूरकर म्हणाले, “महानगरपालिका आणि ‘दिव्य मराठी’च्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. साध्या चिकणमातीपासून गणपतीच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. पुढच्या वर्षी गणेशोत्सवाच्या सुमारे १५ दिवस आधीच हा उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करू. केवळ एका ठिकाणी नव्हे, तर शहरातील प्रत्येक भागात अशा कार्यशाळा आयोजित करून पर्यावरणाचा संदेश १८ लाख नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.” ‘पर्यावरणाला पूरक गणेशोत्सव साजरा करूया’ मनपा आयुक्त अमोल येडगे म्हणाले, “१४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करणे गरजेचे आहे. बाप्पाचे विसर्जन पर्यावरणाला हानी पोहोचवणारे न राहता पर्यावरणाला पूरक असावे, यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पुढेही हा उपक्रम असाच सुरू राहील. सण-उत्सव साजरा करताना कोणालाही त्रास होणार नाही आणि पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.” ‘ज्या मातीपासून बाप्पा बनवतो, तीच माती आपल्याला घडवते’ कार्यशाळेत सहभागी झालेल्या एका महिलेने या उपक्रमाचे महत्त्व सांगताना म्हटले, “ज्या मातीपासून आपण गणपती बनवतो, तीच माती आपल्याला जगवते, टिकवते आणि घडवते. आपण बाप्पाची पूजा करतो, त्याला खूप सारी फुले वाहतो; मात्र नंतर हे निर्माल्य कचऱ्यात जाते. त्यामुळे तुम्हाला जसा जमेल तसा बाप्पा बनवा. शेवटी देव किती सुंदर आहे, यापेक्षा तो आपण मनापासून बनवला आहे, हे महत्त्वाचे आहे. मनापासून बनवलेला बाप्पा नक्कीच पावतो.” ‘आता दरवर्षी मातीचाच बाप्पा बनवणार’ या कार्यशाळेत सहभागी झालेल्या तरुणांनीही मातीच्या गणेशमूर्ती बनवण्याचा अनुभव उत्साहाने सांगितला. “आम्ही लहान असताना मातीचा बाप्पा बनवला होता. मात्र इतक्या वर्षांनंतर पुन्हा स्वतःच्या हातांनी बाप्पा बनवताना खूप छान वाटत आहे. आता दरवर्षी आम्ही मातीचाच बाप्पा बनवणार. कारण पर्यावरण सुरक्षित असेल, तरच आपण सुरक्षित राहू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ‘बाप्पामय’ वातावरण या कार्यशाळेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कुणी बाप्पाची सुबक सोंड घडवत होते, तर कुणी चेहऱ्यावरचे भाव रेखाटत होते. आपल्या कल्पकतेनुसार प्रत्येकाने बाप्पाला आकार देत सजवले. त्यामुळे संपूर्ण श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमात प्रथम क्रमांक डॉ. आरती देवताळ यांनी पटकवला, द्वितीय क्रमांक रेखा बासरकर तर तृतीय क्रमांक युवराज अरुण हातागळे या म.न.पा.च्या शाळेतील विद्यार्थ्याने पटकवला. एवढेच नाही तर उत्तेजनार्थ पारितोषिक देखील देण्यात आले. गणेशमूर्ती स्वतःच्या हातांनी साकारण्याचा आनंद नागरिकांना देतानाच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरात पोहोचवण्याचे काम या उपक्रमातून झाले. त्यामुळे ‘दिव्य मराठी’ आणि संभाजीनगर महापालिकेच्या या उपक्रमाने बाप्पाच्या स्वागतासोबतच पर्यावरण संवर्धनाची जाणीवही नागरिकांच्या मनात रुजवली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
Source link
1000 हून अधिक विद्यार्थी, कुटुंबांनी साकारले मातीचे बाप्पा:‘दिव्य मराठी’च्या गणेशमूर्ती कार्यशाळेला संभाजीनगरकरांचा उदंड प्रतिसाद