महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील गोंधळ, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यांवरून युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रश्नांवर न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी नुकतीच राज्य
.
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही तो घेऊ!
MPSCच्या परीक्षांमधील पेपरफुटीला थेट आयोगाचे अध्यक्ष आणि इतर अधिकारी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, “पेपरफुटीचे पुरावे विद्यार्थी हवेत बोलत नाहीत, ते आमच्याकडे आहेत. पहिल्या दोन परीक्षकांनी पेपर तपासले आणि गुण दिले नाहीत, मात्र तिसऱ्याने कसे गुण दिले? एकाच ट्युशन क्लासमधील आणि एकाच वर्गातील मुले पास कशी होतात? हे सर्व दलालांचे रॅकेट आहे. त्यामुळे, जर या अध्यक्षांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही, तर आम्हाला तो घ्यावा लागेल.”
एसआयटी नको, न्यायालयीन चौकशी हवी
राज्य सरकारने स्थापन केलेल्या SIT चौकशीवर अविश्वास दर्शवत त्यांनी थेट न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. “या सरकारने वर्षभरात 15 ते 20 एसआयटी (SIT) समित्या स्थापन केल्या आहेत, पण एकाचाही रिपोर्ट आलेला नाही. त्यामुळे आम्हाला एसआयटी नको, तर या प्रकरणाची थेट न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या 8 दिवसांच्या आश्वासनावर विश्वास नाही
मुख्यमंत्र्यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी मागितलेल्या आठ दिवसांच्या वेळेवर आदित्य ठाकरे यांनी कडाडून टीका केली. “मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळ अधिवेशनात पोलीस हाऊसिंगच्या प्रश्नावरही ‘आठ दिवसात बैठक घेऊन निर्णय घेऊ’ असे सांगितले होते, ते जून-जुलैचे आश्वासन होते, आता सप्टेंबर उजाडला तरी काहीच झाले नाही. त्यांच्या आश्वासनांवर आता आमचा विश्वास राहिलेला नाही.”
मुंबई-गोवा महामार्गावरून नितीन गडकरी आणि सरकारला टोला
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच खंत व्यक्त केली होती. यावर बोलताना आदित्य म्हणाले, “नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेली भावना अगदी बरोबर आहे, त्यांना लाज वाटलीच पाहिजे. पण हे खातं 12 वर्षे त्यांच्याकडेच होतं, आणि ते काम करणारा कॉन्ट्रॅक्टर कोणाचा होता? हेही त्यांनी सांगावे. त्या कॉन्ट्रॅक्टरवर किती दंड (Penalty) आकारला गेला आणि त्याला देशभरात आणखी किती कामे मिळाली आहेत, याची यादी सरकारने जाहीर करावी.”
अमित ठाकरे आणि व्हायरल व्हिडिओबाबत स्पष्टीकरण
कोकणात जाणाऱ्या बसेसच्या वेळी अमित ठाकरे आल्यावर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत सुरू असताना आदित्य ठाकरे नाचल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर स्पष्टीकरण देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “तो व्हिडिओ भाजपने मॉर्फ केलेला आहे. हे आम्हाला सांगण्यापूर्वी भाजपने दहीहंडीमध्ये त्यांच्या लोकांनी केलेल्या अश्लील नाचावर आधी बोलावे. राज्यगीत सुरू असताना लोक उस्फूर्तपणे जल्लोष करतात, तो उत्साह असतो. पण भाजपने असले निरर्थक विषय न काढता MPSC विद्यार्थ्यांची आत्महत्या, मराठवाडा-विदर्भातील भीषण दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलावे,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
आंदोलन आणखी तीव्र होणार
“विद्यार्थ्यांवर अन्याय होत असताना आम्ही गप्प बसणार नाही. जिथे अन्याय होईल, तिथे आम्ही उभे राहू. जर अन्यायच होत नसेल, तर विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची काय गरज होती? आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रातून, प्रत्येक जिल्ह्यातून आणि तालुक्यातून विद्यार्थी मुंबईत येऊन मोठे आंदोलन उभे करतील,” असा इशारा आदित्य ठाकरे यांनी शेवटी दिला.
हेही वाचा…
सरकारकडून ओबीसींची फसवणूक: त्यांना थेट ‘ओपन’मध्ये टाकण्याचा डाव; राज्यपालांच्या भेटीनंतर नाना पटोलेंचा आरोप

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची राजभवनावर भेट घेतली. या भेटीत राज्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. जातनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचे प्रश्न, MPSC पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांची परिस्थिती आणि दुष्काळसदृश स्थिती या मुद्द्यांकडे पटोलेंनी राज्यपालांचे लक्ष वेधले. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी