![]()
पुण्यातील ऐतिहासिक व पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळापूर परिसरातील रेव्ह पार्टी प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने थेट राज्य सरकारला घेरले आहे. “छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळाच्या पवित्र भूमीत आणि तेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी अशा मद्य आणि अंमली पदार्थांच्या पार्टीला परवानगी दिलीच कशी?” असा संतप्त सवाल करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिवांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सोशल मीडियावरून सविस्तर माहिती देत सरकार आणि पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आळंदी-मरकळ रोडवरील तुळापूर येथील एका खासगी बंगल्यात सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे २:३० वाजता धडक छापा टाकला. ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाने आयोजित या बेकायदेशीर पार्टीतून पोलिसांनी तब्बल १०७ तरुण आणि ४९ तरुणींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बहुतांश तरुण-तरुणी आयटी (माहिती तंत्रज्ञान) क्षेत्रातील असून, तिघे जण अल्पवयीन असल्याचा संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजा, बंदी असलेले हुक्का फ्लेव्हर्स आणि ९ लाख २२ हजार रुपयांच्या मद्यासह एकूण ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी काल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिवांची भेट घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळ असलेल्या तुळापूरात पार्टीची परवानगी दिलीच कशी ? असा जाब विचारला. आता तुमचं हिंदुत्व कुठे गेलं? – रोहिणी खडसे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिवांच्या भेटीसंदर्भात रोहिणी खडसे यांनी माहिती देताना म्हटले की, “रेव्ह पार्टीला राज्य उत्पादन शुल्क विभागानेच परवानगी दिली होती, हा अत्यंत क्लेशदायक आणि करंटेपणाचा प्रकार आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी ज्या तुळापुरात बलिदान दिले, त्या पवित्र भूमीत प्रशासनाने मद्याच्या पार्टीला परवानगी दिली. विशेष म्हणजे, ज्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक दिनाचा सुवर्ण सोहळा साजरा होत होता, त्याच दिवशी हा प्रकार घडला. हे शासन छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने हिंदुत्वाचा टेंभा मिरवत असते मग आता तुमचं हिंदुत्व कुठे गेले?” “राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व शिव-शंभू प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. शिवराज्याभिषेक दिनी पवित्र अशा तुळापूरात या पार्टीची परवानगी देणारा दीडशहाणा कोण ? याची चौकशी विभागाने करावी व त्यावर कठोरात कठोर कारवाई करावी,” अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली. पुणे पोलिसांवर ‘हाय प्रोफाईल’ लोकांना वाचवल्याचा आरोप दरम्यान तुळापूर रेव्ह पार्टीवरील कारवाईवरून रोहिणी खडसे यांनी यापूर्वी पुणे पोलिसांच्या भूमिकेवरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. पोलिसांच्या दुटप्पीपणावर तोफ डागताना त्या म्हणाल्या, “पूर्वी एका प्रकरणात ४-५ लोक जमले तर त्याला पोलिसांनी ‘रेव्ह पार्टी’ नाव दिले होते. आता थेट १५६ लोक सापडल्यावर पोलीस त्याला ‘हाऊस पार्टी’ म्हणून पाठीशी घालत आहेत.” ७८ जणांवरच कारवाई का? “एकूण १५६ लोकांपैकी पोलिसांनी केवळ ७८ लोकांवरच कारवाई का केली? उरलेल्या ७८ लोकांना कोणाच्या दबावाखाली सोडण्यात आले? आणि त्यातल्याही फक्त २९ लोकांचीच वैद्यकीय चाचणी (ड्रग टेस्ट) का करण्यात आली?” नेत्यांची मुलं होती का?: “ज्या इतर संशयितांना पोलिसांनी सोडून दिले, ते काय आजी-माजी आमदार, खासदारांची मुले होती? की सरकारला मदत करणारे बडे उद्योगपती होते?” असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला आहे. पुणे पोलिसांना कोणीतरी चावी देतंय! दरम्यान रोहिणी खडसे यांनी त्यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यावरी कारवाईचा दाखला देत आरोप केला होता की, पूर्वीच्या प्रकरणांमध्ये पोलीस स्वतःहून व्हिडिओ क्लिप्स आणि माहिती मीडियाला पुरवून ‘मीडिया ट्रायल’ चालवायचे. मात्र, या तुळापूर प्रकरणाला आठवडा उलटला तरी कारवाईचा एकही व्हिडिओ समोर आलेला नाही किंवा परवानगीचे अधिकृत पत्र दाखवले जात नाही. “पुणे पोलिसांना वरून कोणीतरी चावी देतंय आणि त्यानुसारच हे चक्र फिरत आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
Source link
पुणे रेव्ह पार्टीवरून शरद पवार गट आक्रमक:शिवराज्याभिषेक दिनी पार्टीची परवानगी देणारा दीडशहाणा कोण? रोहिणी खडसेंचा सवाल