Headlines

अनोखी मागणी:माझ्या जमिनीचे पैसे परत घ्या, पण शक्तीपीठ महामार्गावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारा!, धाराशिवच्या शेतकऱ्याचा सरकारला थेट प्रस्ताव




महाराष्ट्र शासनाच्या ‘शक्तीपीठ महामार्गा’ला सध्या राज्यभरातील शेतकरी आणि विविध संघटनांकडून जमीन संपादनावरून तीव्र विरोध होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाविरोधात आंदोलने तीव्र झाली असतानाच, धाराशिव जिल्ह्यातून मात्र एक अत्यंत वेगळी आणि भावनिक भूमिका समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील चिखली गावचे तरुण शेतकरी धनंजय तांबे यांनी या महामार्गासाठी स्वतःची हक्काची एक एकर जमीन सरकारला चक्क ‘मोफत’ देण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, हा प्रस्ताव ठेवताना ते म्हणाले की शक्तीपीठ महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारावा त्यासाठी मला एक एकर जमीनीचा मोबदला देऊ नका, असे तांबे यांनी म्हटले आहे. काय आहे धनंजय तांबे यांची अट? शक्तीपीठ महामार्गासाठी धनंजय तांबे यांची दोन एकरपेक्षा जास्त जमीन संपादित केली जाणार आहे. या भूसंपादनाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना तांबे यांनी सांगितले की, महामार्गासाठी माझी दोन एकरपेक्षा जास्त जमीन जात आहे. यातील एका एकर जमिनीचा जो काही मोबदला मिळेल, तो संपूर्ण पैसा मी शासनाला परत करायला तयार आहे; मात्र त्या बदल्यात सरकारने शक्तीपीठ महामार्गावर ‘तुळजापूर-कळंब रोड’ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक भव्य आणि देखणा पुतळा उभारावा. आपली ही मागणी थेट सरकार आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी तांबे यांनी धाराशिव शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये मोठे बॅनर्स लावले असून, या अनोख्या बॅनरबाजीमुळे सध्या जिल्हाभरात यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गावात दोन वेगवेगळे प्रवाह एककीडे धनंजय तांबे यांनी शिवभक्तीपोटी भावनिक साद घालत जमीन मोफत देण्याची तयारी दर्शवली असली, तरी चिखली गावातील इतर ग्रामस्थांनी आणि बाधित शेतकऱ्यांनी मात्र व्यावहारिक भूमिका घेतली आहे. महामार्गासाठी ज्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत, त्यांना कायद्यानुसार योग्य आणि चालू बाजारभावानुसार आर्थिक मोबदला मिळालाच पाहिजे, असे गावातील इतर शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे सध्या गावात दोन वेगवेगळ्या प्रवाहांवर चर्चा सुरू आहेत. दरम्यान, धनंजय तांबे यांच्या या मागणीमुळे शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता राज्य सरकार या शेतकऱ्याच्या मागणीची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *