Headlines

गोदावरी पाटबंधारे कार्यालय नांदेडला हलवले, संभाजीनगरात महामोर्चा:राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हकालपट्टीची मागणी; हजारो नागरिक रस्त्यावर




छत्रपती संभाजीनगर येथून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता कार्यालय नांदेडला हलवल्याच्या निषेधार्थ आज, १२ जून रोजी शहरात महामोर्चा काढण्यात आला. कोणत्याही कॅबिनेट मंजुरीविना हे कार्यालय हलवण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सेव्हन हिल उड्डाणपूल ते गोदावरी पाटबंधारे कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चामुळे जालना रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली. खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हा परिषद सदस्य विद्या रमेश गायकवाड, अभय टाकसाळ, माजी नगरसेवक रमेश जायभाय आणि प्रतीक गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. ‘मराठवाडा बहुजन विकास आघाडी’ने या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. आघाडीचे संस्थापक अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी मंत्री विखे-पाटील यांच्या फोटोवर अंडी फेकून निषेध नोंदवला आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. रमेश गायकवाड यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे मध्यवर्ती मुख्यालय असताना, केवळ राजकीय स्वार्थापोटी कार्यालय हलवणे हा या भागावर अन्याय आहे. त्यांनी हा शासन निर्णय मागे न घेतल्यास यापुढेही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. आंदोलकांनी अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. यात न्यायालयाचे आदेश असतानाही जायकवाडीचे हक्काचे पाणी जाणीवपूर्वक अडवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. पाणीटंचाईमुळे पिके करपून हजारो शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आल्याचेही त्यांनी नमूद केले. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलकांनी दावा केला की, आतापर्यंत ६० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि मंत्री विखे-पाटील यांच्या कार्यकाळात १३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोपही त्यांनी केला. या गंभीर प्रश्नावर मराठवाड्याचे खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अंबादास दानवे आणि रमेश गायकवाड यांच्यासह आघाडीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जाब विचारणार आहे. शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी आजच्या मोर्चात सर्वपक्षीय नेते, शेतकरी आणि जनतेने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *