![]()
येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या कुटुंबीयांची खासदार संदीपान भुमरे यांनी शनिवारी भेट घेतली. हा केवळ अपघात नसून पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी सुरुवातीला ८ तासांत अटकेचे आश्वासन दिले होते. मात्र २४ तास उलटूनही कारवाई शून्य असल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. सुरेश बोरसे हे अत्यंत प्रामाणिक आणि गावचे आदर्श शिक्षक होते. त्यांच्या संशयास्पद मृत्यूला न्याय मिळालाच पाहिजे. हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न मी कधीही यशस्वी होऊ देणार नाही. मी स्वतः या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करणार आहे. दोषी व्यक्ती कितीही प्रभावशाली असली, तरी त्यांना सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी दोषींवर तत्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. तसे न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दोषींवर कारवाई करण्यास पोलिस टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे. शिक्षक सेनेचे पोलिस अधीक्षकांना निवेदन शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने ग्रामीण पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सर्व मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली. पोलिस अधीक्षकांनी निवेदन स्वीकारले. प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
Source link
शिक्षक मृत्यू प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार:खासदार संदीपान भुमरे, वेरूळ येथे घेतली बोरसे कुटुंबाची भेट