![]()
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील दोन बडे नेते भगीरथ भालके आणि अनिल सावंत उद्या, १२ एप्रिल रोजी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे
.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा येथे कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या होत्या. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होणारी कार्यकर्त्यांची अडवणूक थांबवण्यासाठी आणि रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी सत्तेसोबत जाण्याचा सूर या बैठकीत उमटला. त्यानंतर भालके यांनी धनुष्यबाण’ हाती घेण्याचे निश्चित केले.
भगीरथ भालके यांच्यासोबत पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके, दोन्ही तालुक्यातील अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि भालके गटाचे निष्ठावान कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते व भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला या भागात निर्णायक ताकद मिळणार आहे. पत्रकार परिषदेस नगरसेवक सुधीर धोत्रे, संजय बंदपट्टे, किरणराज घाडगे, विनायक देवमारे आदी उपस्थित होते.
२०२९ साली आमदार सेनेचा असेल ^कोणत्याही पदासाठी नाही, तर केवळ शहराच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सत्तेसोबत जात आहोत. नगरविकास विभागाकडून मोठा निधी आणून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा मानस आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, २०२९ चा पंढरपूरचा आमदार हा शिवसेनेचा असेल.” भगीरथ भालके, माजी अध्यक्ष, विठ्ठल साखर कारखाना.
विकासकामांसाठी ताकद देणार ^मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे करण्यासाठी आम्ही सत्तेत सामील होत आहोत. नगरविकास खात्याच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही लागेल ती ताकद पाठीशी उभी करू.” अनिल सावंत, चेअरमन, भैरवनाथ शुगर.