Headlines

मृग दारात, पण पाऊस बेपत्ता:पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा; भाजीपाला उत्पादकही अडचणीत, सर्वांचे डोळे आकाशाकडे‎




खरीप हंगामाची चाहूल लागली असली तरी पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने घाटनांद्रासह परिसरातील शेतकरी वर्ग कमालीचा चिंतेत सापडला आहे. जूनचा दुसरा आठवडा संपला तरी मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णपणे खोळंबली असून, बळीराजा आता आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. खरीप हंगामातील भरघोस उत्पादनासाठी वेळेत मशागत आणि योग्य वेळी पेरणी होणे अत्यावश्यक मानले जाते. यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण करणाऱ्या पावसाची गरज असते. दरवर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात वळीवाच्या सरी कोसळून तापमानात घट होते आणि शेतकऱ्यांना मशागत तसेच भाजीपाला लागवडीसाठी दिलासा मिळतो. मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने चित्र पूर्णपणे पालटले आहे. परिसरात अद्याप सलग व समाधानकारक एकही पाऊस न झाल्याने नांगरणी, वखरणी आणि इतर पेरणीपूर्व कामांना ब्रेक लागला आहे. मृग नक्षत्र तोंडावर आले असतानाही जमिनीत आवश्यक ओलावा नसल्याने शेतकऱ्यांना मशागतीची कामे पुढे ढकलावी लागत आहेत. परिणामी, खरीपाची पेरणी वेळेत होणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता वाढली आहे. यंदा हवामान खात्याकडून सुपर एल निनोच्या संभाव्य प्रभावाबाबत आधीच चर्चा सुरू आहे. त्यातच मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी घोर पडला आहे. आता लवकरात लवकर दमदार पावसाच्या सरी बरसून मशागतीला गती मिळावी, एवढीच अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. जमिनीच्या मशागतीसाठी ओलावा अत्यावश्यक जमिनीत जोपर्यंत पुरेसा ओलावा निर्माण होत नाही, तोपर्यंत मशागत प्रभावीपणे करता येत नाही. सध्या पाऊस नसल्याने संपूर्ण नियोजन विस्कळीत होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. आता सर्वांचे लक्ष केवळ आणि केवळ दमदार मान्सूनकडे लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *